Mass Copy : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षांदरम्यान यंदा सीसीटीव्ही यंत्रणेच्या मदतीने सामूहिक कॉपीचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. या प्रकरणी आतापर्यंत एकूण ८१ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती राज्य मंडळाने परिपत्रकाद्वारे दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बारावी परीक्षेत बीड जिल्ह्यातील चौसाळा येथील कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय (केंद्र क्रमांक २२४) येथे सामूहिक कॉपीचा प्रकार उघडकीस आला. १० फेब्रुवारी रोजी पहिल्याच पेपरदरम्यान घडलेल्या या प्रकारानंतर प्रशासनाने १७ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित केले.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात जैतापूर येथील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालय (केंद्र क्रमांक ००७९) येथेही ‘मास कॉपी’चा प्रकार समोर आला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पर्यवेक्षक आणि केंद्र संचालक प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करत असल्याचे दिसून आल्याने २४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी २१ जणांना निलंबित करण्यात आले आहे.
जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील केंद्र क्रमांक ०४३९, ०४२३ आणि ०४२१ येथे इंग्रजीच्या पेपरदरम्यान विद्यार्थ्यांकडून कॉपी करताना आढळून आले. याप्रकरणी नियुक्त पाच पर्यवेक्षक शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
जामुडाफाटा येथील श्री मैनागिरी महाराज कनिष्ठ महाविद्यालय (केंद्र क्रमांक ९०६) येथे १६ फेब्रुवारी रोजी भौतिकशास्त्राच्या परीक्षेत तब्बल ५८१ विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपी केल्याचे निदर्शनास आले. प्रयोगशाळा परिचराकडे मोबाइल आढळल्याने तीन संस्थांतील सहा शाळांमधील २८ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्यातील ब्रोमनवार विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय (केंद्र क्रमांक ६१५) येथे राज्यशास्त्र विषयाच्या पेपरमध्ये मायक्रोनोट आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवरून काढलेले मुद्रित साहित्य वापरून सामूहिक कॉपीचा प्रकार आढळला. या प्रकरणी तीन शिक्षक आणि एका शिपायावर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात सलगरा येथील जिल्हा परिषद हायस्कूल (केंद्र क्रमांक ३९३) येथे रसायनशास्त्राच्या पेपरदरम्यान नऊ विद्यार्थी गैरमार्ग करताना आढळले. त्यापैकी सहा विद्यार्थ्यांकडे मोबाइल सापडले. याप्रकरणी संबंधित संस्थेतील तीन शिक्षकांना निलंबित करण्यात आले असून जिल्हा परिषदेच्या आणखी तीन कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
दरम्यान, दहावी परीक्षेत बीड जिल्ह्यातील कुर्ला तालुक्यातील यशवंत विद्यालय (केंद्र क्रमांक २०५६) येथे परीक्षार्थ्यांची गैरसोय झाल्यामुळे मुख्याध्यापक व केंद्र संचालकांना निलंबित करण्यात आले. तसेच नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात बेटमोगरा येथील जिल्हा परिषद हायस्कूल (केंद्र क्रमांक ५२३१) येथे तोतया विद्यार्थी परीक्षा देताना आढळल्याने परीक्षक आणि केंद्रप्रमुख यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.










