DME Gas : अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आज सलग १४ व्या दिवशीही सुरूच असून, त्याचे गंभीर परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर उमटू लागले आहेत. या युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभरात इंधनाचा तुटवडा निर्माण झाला असून, भारतालाही याचा मोठा फटका बसत आहे. विशेषतः द्रवीभूत पेट्रोलियम वायू (LPG) पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने हॉटेल्स, कारखाने आणि शाळांसारख्या संस्थांना इंधन टंचाईचा सामना करावा लागत आहे. अशा कठीण प्रसंगी पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (NCL) मधील शास्त्रज्ञांनी डायमिथाईल इथर (DME) या वायूची यशस्वी निर्मिती करून भारताला मोठा दिलासा दिला आहे.
दोन दशकांच्या संशोधनाचे यश
‘एनसीएल’मधील नामवंत शास्त्रज्ञ डॉ. तिरुमलाईवामी राजा आणि त्यांच्या पथकाने गेल्या २० वर्षांच्या अथक परिश्रमानंतर हा वायू तयार करण्यासाठी आवश्यक असलेले ‘उत्प्रेरक’ (Catalyst) प्रयोगशाळेत विकसित केले आहे. हे संशोधन केवळ कागदावर मर्यादित न राहता, आता प्रायोगिक तत्त्वावर (Pilot Project) दररोज २५० किलो ‘डीएमई’ वायूचे उत्पादन घेतले जात आहे. भारतीय बनावटीच्या उत्प्रेरकापासून तयार झालेला हा वायू पूर्णपणे स्वदेशी असून, भविष्यात मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी औद्योगिक कंपन्यांशी करार करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
LPG वरील अवलंबित्व कमी होणार
भारताची इंधनविषयक आकडेवारी अत्यंत चिंताजनक आहे. भारत दरवर्षी साधारण ३१.३ दशलक्ष टन एलपीजीचा वापर करतो, ज्यापैकी ८७% वापर घरगुती स्वयंपाकासाठी होतो. चिंतेची बाब म्हणजे, या एकूण गरजेपैकी ६२% वायू आयात केला जातो आणि त्यातील ८५ ते ९०% आयात ही होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होते. सध्या युद्धामुळे हा सागरी मार्ग बंद असल्याने सौदी अरेबियासारख्या देशांतून येणारे टँकर ठप्प झाले आहेत. अशा स्थितीत, जर ‘डीएमई’ वायू एलपीजीमध्ये ८ टक्क्यांपर्यंत मिसळला, तर भारताचे परकीय देशांवरील अवलंबित्व लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते.
पर्यावरणपूरक आणि किफायतशीर पर्याय
शास्त्रज्ञांच्या मते, डायमिथाईल इथर हा एलपीजीपेक्षा अधिक शुद्ध इंधन पर्याय आहे. हा वायू जळताना त्याची ज्योत (Flame) पारदर्शक असते, ज्यामुळे तो अत्यंत पर्यावरणपूरक ठरतो. हा वायू स्वतंत्रपणे इंधन म्हणून वापरता येतो किंवा एलपीजीमध्ये मिश्रित करूनही वापरता येतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, एकदा का याचे मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक उत्पादन सुरू झाले, तर या वायूची किंमत एलपीजीच्या तुलनेत अत्यंत कमी असेल, ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना वाढत्या महागाईपासून दिलासा मिळू शकेल.











