Home / देश-विदेश / Tattoo shops seal: कळंगुटमध्ये बेकायदेशीर धंद्यांवर लगाम; सात टॅटू दुकाने आणि एक रेस्टॉरंट सील

Tattoo shops seal: कळंगुटमध्ये बेकायदेशीर धंद्यांवर लगाम; सात टॅटू दुकाने आणि एक रेस्टॉरंट सील

Tattoo shops seal : कळंगुट प्रोमिनाद या समुद्रकिनारी मार्गावरील सात टॅटू दुकाने तसेच खोब्रावाडा–बागा परिसरातील एका उपहारगृहाला पंचायतीने सील ठोकत...

By: Team Navakal
Tattoo shops seal
Social + WhatsApp CTA

Tattoo shops seal : कळंगुट प्रोमिनाद या समुद्रकिनारी मार्गावरील सात टॅटू दुकाने तसेच खोब्रावाडा–बागा परिसरातील एका उपहारगृहाला पंचायतीने सील ठोकत बेकायदेशीर व्यवसायाविरोधात कठोर कारवाई केली. वैध परवान्याविना व्यवसाय सुरू ठेवणे तसेच बेकायदेशीर कृत्ये सुरू असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.

ही मोहीम सरपंच जोजफ सिक्वेरा आणि पंचायत सचिव अर्जुन वेळीप यांच्या नेतृत्वाखालील पथकाने राबवली. कारवाईदरम्यान संबंधित दुकाने आणि उपहारगृह तपासून पाहण्यात आले असता आवश्यक परवाने नसल्याचे आढळून आले. त्यामुळे तात्काळ सील करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सरपंच सिक्वेरा यांनी सांगितले की, प्रोमिनाद परिसरातील काही टॅटू दुकानांबाबत पर्यटकांकडून वारंवार तक्रारी येत होत्या. दुकानांतील काही कर्मचारी पर्यटकांना जबरदस्तीने टॅटू काढण्यास प्रवृत्त करणे, खोटी आश्वासने देणे, तसेच बेकायदेशीर कृत्यांची प्रलोभने दाखवून आर्थिक फसवणूक करीत असल्याचे प्रकार उघड झाले होते. या तक्रारींची चौकशी केल्यानंतर संबंधित दुकाने पंचायतीच्या वैध परवान्याविना सुरू असल्याचेही स्पष्ट झाले. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही दुकाने सील करण्याची कारवाई करण्यात आली.

याशिवाय खोब्रावाडा–बागा परिसरातील एका उपहारगृहावरही पंचायतीने कारवाई केली. संबंधित जागेचा वापर बेकायदेशीर कृत्यांसाठी होत असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाल्यानंतर तपास करण्यात आला. तपासात नियमांचे उल्लंघन आढळल्याने त्या उपहारगृहालाही सील करण्यात आले.

दरम्यान, कळंगुट समुद्रकिनारा परिसरातील पर्यटन व्यवस्था अधिक शिस्तबद्ध करण्यासाठी पंचायत प्रशासनाने आणखी काही कठोर निर्णय घेतले आहेत. प्रोमिनाद परिसरातील तीन घाऊक मद्यविक्री दुकाने बंद करण्याचा ठरावही पंचायतीने मंजूर केला आहे. समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांकडून होणारे उघडपणे मद्यपान आणि त्यामुळे निर्माण होणारा गोंधळ रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

या संदर्भात संबंधित दुकानदारांचे उत्पादन शुल्क परवाने रद्द करण्यासाठी गोवा अबकारी विभाग यांना पत्र पाठविण्यात येणार असल्याची माहिती पंचायतीने दिली. स्थानिक नागरिक आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच पर्यटनस्थळांची प्रतिमा जपण्यासाठी अशा प्रकारच्या बेकायदेशीर व्यवसायांवर पुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पंचायत प्रशासनाने दिला आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या