Dog Attack : पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरातून अतिशय हृदयद्रावक आणि धक्कादायक वृत्त समोर आले आहे. येथील आंबेठाण चौक परिसरात भटक्या कुत्र्यांच्या टोळीने एका महिलेवर प्राणघातक हल्ला करून तिचा जीव घेतल्याची घटना घडली आहे. या भीषण घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येचा आणि आक्रमकतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
नेमकी घटना काय?
अधिकच्या माहितीनुसार, शोभा विजय वाघमारे (रा. मूळ देगलूर, जि. नांदेड; सध्या चाकण) असे या मृत महिलेचे नाव आहे. १६ मार्च रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास त्या आंबेठाण चौकाजवळील उड्डाणपुलाखालून सर्व्हिस रोडने जात होत्या. यावेळी अचानक सहा ते सात हिंस्त्र भटक्या कुत्र्यांनी त्यांना घेराव घातला. या प्राण्यांनी त्यांच्यावर चहुबाजूंनी हल्ला चढवला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसून आले की, प्रसंगावधान राखून संबंधित महिलेने जमिनीवरील दगड उचलून कुत्र्यांना पळवून लावण्याचा आणि स्वतःचा बचाव करण्याचा आटोकाट प्रयत्न केला; मात्र कुत्र्यांच्या झुंडीपुढे त्यांचा प्रतिकार अपुरा पडला.
भयानक हल्ल्यात मृत्यू-
कुत्र्यांनी या महिलेच्या हात, पाय, तोंड आणि मानेवर अशा वर्मी जागी गंभीर जखमा केल्या. या हल्ल्यात प्रचंड रक्तस्त्राव झाल्यामुळे अवघ्या १५ मिनिटांच्या आतच त्यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी जेव्हा स्थानिकांना या महिलेचा मृतदेह छिन्नविच्छिन्न आणि विवस्त्र अवस्थेत आढळला, तेव्हा परिसरात मोठी खळबळ उडाली. सुरुवातीला हा प्रकार बलात्कार किंवा निर्घृण हत्या असावा, असा संशय स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत होता. मात्र, घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवली आणि परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. या फुटेजमुळे या महिलेचा मृत्यू कोणत्याही मानवी कृत्यामुळे नसून कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्यामुळे झाल्याचे निष्पन्न झाले.
नागरिकांमध्ये संतापाची लाट-
आजवर भटक्या कुत्र्यांचा उपद्रव प्रामुख्याने रात्रीच्या वेळी किंवा पहाटे फिरायला जाणाऱ्या नागरिकांना जाणवत होता. परंतु, आता भरवस्तीत आणि दिवसाढवळ्याही कुत्र्यांच्या टोळ्या लहान मुले, महिला आणि वृद्धांना लक्ष्य करत असल्याने जनसामान्यांमध्ये तीव्र भीती निर्माण झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सध्या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. या भीषण दुर्घटनेनंतर चाकणमधील स्थानिक नागरिकांनी प्रशासनाप्रती संताप व्यक्त केला असून, भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा आणि भविष्यातील अशा घटना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे.










