Nora Fatehi new song lyrics controversy : कन्नड चित्रपट ‘केडी: द डेव्हिल’ मधील ‘सरके चुनर तेरी सरके’ हे नवीन गाणे प्रदर्शित झाल्यापासून एका मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. अभिनेत्री नोरा फतेही आणि संजय दत्त यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्यावर अश्लीलतेचा शिक्का मारला जात आहे.
सोशल मीडियावर या गाण्यातील शब्दांच्या निवडीवरून आणि भडक नृत्यावरून संतापाची लाट उसळली असून, यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
गाण्यातील अश्लील शब्दांवरून नेटकरी आक्रमक
हे गाणे प्रदर्शित होताच त्यातील आक्षेपार्ह शब्द आणि द्विअर्थी संवाद प्रेक्षकांच्या निशाण्यावर आले आहेत. अनेक नेटकऱ्यांनी हे गाणे ‘अश्लीलतेचा कळस’ असल्याचे म्हटले आहे. एका डान्स-बारच्या पार्श्वभूमीवर चित्रित केलेल्या या गाण्यात ज्या प्रकारे नोरा फतेहीने नृत्य केले आहे आणि ज्या प्रकारचे शब्द वापरले आहेत, ते अत्यंत खालच्या थराचे असल्याची टीका होत आहे.
सेन्सर बोर्डाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, अशा प्रकारची गाणी मुख्य प्रवाहात कशी काय येऊ शकतात, असा सवाल विचारला जात आहे.
गायक अरमान मलिकचा संताप आणि टीका
संगीताचा दर्जा खालावत चालल्याचा मुद्दा आता कलाकारही उपस्थित करू लागले आहेत. प्रसिद्ध गायक अरमान मलिकने या गाण्यावरून थेट बॉलिवूड आणि संगीत क्षेत्रातील लेखनावर ताशेरे ओढले आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर त्याने आपली नाराजी व्यक्त करताना म्हटले की, “व्यावसायिक गाणी लिहिण्याचा स्तर इतका खाली घसरलेला पाहून खूप वाईट वाटते. मला जे ऐकू आले ते खरंच बरोबर आहे का, याची खात्री करण्यासाठी मला हे गाणे पुन्हा ऐकावे लागले.”
अरमानच्या या प्रतिक्रियेला हजारो नेटकऱ्यांनी पाठिंबा दिला असून, केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी गाण्यांच्या दर्जाशी तडजोड केली जात असल्याचा आरोप केला आहे.
चित्रपटाची पार्श्वभूमी आणि प्रदर्शन
‘सरके चुनर तेरी सरके’ हे गाणे अर्जुन जन्या यांनी संगीतबद्ध केले असून राकीब आलम यांनी त्याचे शब्द लिहिले आहेत. हे गाणे ध्रुव सर्जा स्टारर ‘केडी: द डेव्हिल’ या बहुचर्चित पॅन-इंडिया चित्रपटाचा भाग आहे. १९७० च्या दशकातील गुन्हेगारी विश्वावर आधारित हा चित्रपट ३० एप्रिल २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
मात्र, प्रदर्शनापूर्वीच गाण्यामुळे झालेल्या वादामुळे हा चित्रपट नकारात्मक चर्चेत आला आहे. निर्माते किंवा अभिनेत्री नोरा फतेही या वादावर काय भूमिका घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे देखील वाचा – USCIRF Report: भारताचे अमेरिकेला जशास तसे उत्तर! ‘RSS’ आणि ‘RAW’ वर निर्बंधांची शिफारस करणारा अहवाल फेटाळला











