Maharashtra Weather Update: गेल्या आठवडाभरापासून प्रचंड उन्हामुळे होरपळणाऱ्या विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्रातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तापमानात ४ अंश सेल्सिअसने घट झाल्यामुळे उन्हाचा तडाखा काहीसा कमी होणार असला, तरी हवामान विभागाने आता पावसाचा इशारा दिला आहे.
ऐन रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असतानाच वादळी वारे आणि मेघगर्जनेसह येणारा हा पाऊस बळीराजाची चिंता वाढवणारा ठरू शकतो.
वातावरणात का झाला बदल?
हवामान तज्ज्ञांच्या मते, गुजरात आणि महाराष्ट्राच्या काही भागांवर वाऱ्याची प्रतिचक्रीय स्थिती निर्माण झाली होती, ज्यामुळे उष्णतेची लाट आली होती. मात्र, आता विदर्भापासून दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत द्रोणीय स्थिती तयार झाली आहे. यामुळे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रावरून बाष्पयुक्त वारे राज्याकडे सरकत आहेत. परिणामी, ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची चिन्हे आहेत.
पाच दिवसांचा अंदाज आणि गारपीट
आजपासून शुक्रवारपर्यंत कोकण वगळता राज्यातील अनेक भागांत दुपारनंतर पावसाची शक्यता आहे. विशेषतः गुढीपाडवा आणि त्याच्या आसपासच्या दिवसांत म्हणजे १८, १९ आणि २० मार्च रोजी पावसाचा जोर अधिक असेल.
- गारपिटीचा इशारा: १८ मार्च रोजी अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या सहा जिल्ह्यांत किरकोळ गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- पावसाची शक्यता असलेले २० जिल्हे: विदर्भातील सर्व जिल्ह्यांसह नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, बीड, धाराशिव, लातूर तसेच मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, सातारा, सांगली आणि सोलापूरमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो.
कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात उकाडा कायम
मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या पट्ट्यात पावसाची शक्यता कमी असली तरी, रात्रीचा उकाडा वाढणार आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नाशिक आणि पुणे परिसरातही दिवसा उष्णता आणि रात्री घाम फोडणारा उकाडा जाणवेल, असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
हे देखील वाचा – PNG Connection Incentives: गॅस सिलेंडरची कटकट संपणार! पीएनजी कनेक्शनसाठी सरकारी कंपन्यांकडून खास ऑफर्स; जाणून घ्या तुम्हाला काय फायदा होईल?











