Drone At US : इस्रायलच्या साथीने अमेरिकेने इराणविरोधात पुकारलेल्या युद्धामुळे आखाती देशांमधील परिस्थिती कमालीची स्फोटक झाली आहे. इराणकडून अमेरिकेच्या लष्करी तळांवर भीषण प्रतिहल्ले सुरू असतानाच, आता थेट अमेरिकेच्या भूमीवर एक खळबळजनक घटना घडली आहे. जगातील सर्वात शक्तिशाली देश समजल्या जाणाऱ्या अमेरिकेची सुरक्षा यंत्रणा एका संशयास्पद ड्रोन घोंगावण्यामुळे हादरली असून, प्रशासनाने ‘ग्लोबल सिक्युरिटी अलर्ट’ जारी केला आहे.
अत्यंत सुरक्षित क्षेत्रात अज्ञात ड्रोन्सचा शिरकाव-
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रूबियो आणि संरक्षण मंत्री पीट हेगसेथ हे ज्या लष्करी तळावर वास्तव्यास आहेत, त्या अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या क्षेत्रावर अज्ञात ड्रोन्स घोंगावताना आढळले आहेत. ही घटना समोर येताच अमेरिकेच्या गुप्तचर संस्था आणि सुरक्षा यंत्रणांची झोप उडाली आहे. या लष्करी तळावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था असतानाही अज्ञात ड्रोन्सने तिथे प्रवेश कसा केला, हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. या घटनेमुळे अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षेतील त्रुटी चव्हाट्यावर आल्याचे बोलले जात आहे.
व्हाईट हाऊसमध्ये तातडीची बैठक आणि जागतिक इशारा-
या संशयास्पद ड्रोनच्या वावरामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता, व्हाईट हाऊसमध्ये तातडीने उच्चस्तरीय सुरक्षा बैठक बोलावण्यात आली. राष्ट्राध्यक्षांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत देशाच्या संरक्षण धोरणावर चर्चा करण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून जगभरातील सर्व अमेरिकन दूतावासांसाठी ‘ग्लोबल सिक्युरिटी अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. इराणच्या ड्रोन तंत्रज्ञानाने अमेरिकेला सळो की पळो करून सोडले असून, या ड्रोन हल्ल्यांमुळे अमेरिकेचे मोठे नुकसान झाल्याचेही वृत्त आहे.
इराणचा तीव्र प्रतिकार आणि ‘निर्वाणीचा इशारा’-
युद्धाच्या मैदानात इराणने अमेरिकेसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आणि अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी मारले गेल्यानंतर, इराणने अमेरिकेला ‘निर्वाणीचा इशारा’ दिला होता. आखाती देशांमधील अमेरिकन तळांना लक्ष्य केल्यानंतर आता इराणचे तंत्रज्ञान थेट अमेरिकेच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या निवासस्थानापर्यंत पोहोचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. इराणच्या या आक्रमक पवित्र्यामुळे अमेरिकेला बचावात्मक पवित्रा घ्यावा लागत आहे.
अमेरिकेच्या लष्करी तळांवर अज्ञात ड्रोन्सचा घोंगावट; ‘फोर्ट मॅकनायर’सह महत्त्वाच्या तळांवर हाय-अलर्ट, ‘सिक्युरिटी स्टेटस चार्ली’ लागू
वॉशिंग्टन डी.सी.: अमेरिका आणि इराणमधील युद्धजन्य परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असतानाच, आता थेट अमेरिकेच्या राजधानीत घुसखोरीच्या घटना समोर येत आहेत. ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, वॉशिंग्टनमधील अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या ‘फोर्ट लेस्ले जे. मॅकनायर’ (Fort Lesley J. McNair) या लष्करी तळाच्या आकाशात अनेक संशयास्पद ड्रोन्स घोंगावताना आढळले आहेत. या घटनेमुळे अमेरिकन सुरक्षा यंत्रणांची झोप उडाली असून संपूर्ण देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अज्ञात ड्रोन्सचे गूढ कायम
हे संशयास्पद ड्रोन्स नेमके कोठून आले आणि त्यांचा मुख्य उद्देश काय होता, याचा शोध घेण्यात अमेरिकेच्या अत्यंत प्रगत मानल्या जाणाऱ्या गुप्तचर यंत्रणांना अद्याप यश आलेले नाही. या लष्करी तळावर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्री वास्तव्यास असल्याने या घटनेकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. इराणने दिलेल्या निर्वाणीच्या इशाऱ्यानंतर थेट राजधानीतील लष्करी तळावर अशा प्रकारे ड्रोन्सचा वावर आढळणे, हा अमेरिकेच्या सुरक्षा व्यवस्थेला दिलेले मोठे आव्हान मानले जात आहे.
‘सिक्युरिटी स्टेटस चार्ली’ घोषित: मोठ्या हल्ल्याची शक्यता
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अमेरिकन संरक्षण विभागाने (Pentagon) तातडीने पावले उचलली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून ‘मॅकडिल एअर फोर्स बेस’ आणि ‘जॉइंट बेस मॅकगुयर-डिक्स-लेकहर्स्ट’ या दोन महत्त्वाच्या तळांवर ‘सिक्युरिटी स्टेटस चार्ली’ (Security Status Charlie) लागू करण्यात आला आहे. लष्करी परिभाषेत ‘स्टॅटस चार्ली’ हा अत्यंत गंभीर इशारा मानला जातो, जो एखाद्या संभाव्य मोठ्या दहशतवादी किंवा शत्रू राष्ट्राच्या हल्ल्याची पूर्वसूचना देतो. या स्थितीचा अर्थ असा की, सुरक्षा दलांनी आता सर्वोच्च पातळीवरील बचावात्मक तयारी केली आहे.
सुरक्षा यंत्रणांची हतबलता?
जगातील सर्वात प्रगत रडार यंत्रणा आणि हवाई संरक्षण कवच असूनही हे ड्रोन्स प्रतिबंधात्मक क्षेत्रात घुसण्यास यशस्वी झाले, ही बाब अमेरिकेसाठी चिंतेची ठरली आहे. इराणच्या प्रगत ड्रोन तंत्रज्ञानाने यापूर्वीही अमेरिकेच्या आखाती देशांमधील तळांचे नुकसान केले आहे. आता थेट अमेरिकन भूमीवर अशा प्रकारची घुसखोरी झाल्याने, व्हाईट हाऊसमध्ये सतत उच्चस्तरीय बैठकांचे सत्र सुरू आहे. या घटनेनंतर अमेरिकेने आपल्या सर्व लष्करी तळांवरील सुरक्षा कडक केली असून, आकाशात दिसणाऱ्या कोणत्याही संशयास्पद वस्तूवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.










