Dhurandhar The Revenge : अभिनेता रणवीर सिंह अभिनीत ‘धुरंधर’ या चित्रपटाच्या सिक्वेलने म्हणजेच ‘धुरंधर २: द रिव्हेंज’ने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः वादळ निर्माण केले आहे. प्रदर्शनानंतर अवघ्या दोन दिवसांतच या चित्रपटाने जागतिक स्तरावर २०० कोटी रुपयांहून अधिक कमाईचा टप्पा पार करत सिनेसृष्टीला थक्क केले आहे. देशातील ‘सर्वाधिक मोठी ओपनिंग’ घेणाऱ्या पहिल्या चार चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाने मानाचे स्थान मिळवले असून, प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादामुळे हा चित्रपट लवकरच कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित करेल, असे चित्र दिसत आहे.
चित्रपटाच्या कमाईचा प्रवास १८ मार्च रोजी झालेल्या ‘पेड प्रीव्ह्यू’ शोपासूनच अत्यंत प्रभावी राहिला आहे. केवळ प्रीव्ह्यू शोमधून या चित्रपटाने ४३ कोटी रुपयांची विक्रमी कमाई केली, तर पहिल्याच दिवशी १०० कोटींचा आकडा पार करून बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा निर्माण केला. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, दुसऱ्या दिवशी चित्रपटाने ८०.७२ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी कमाईत २१.३ टक्क्यांची किंचित घट झाली असली, तरी एकूण दोन दिवसांचे जागतिक कलेक्शन २६९.३९ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. विशेष म्हणजे, तिकिटांचे दर चढे असूनही प्रेक्षकांनी सिनेमागृहांमध्ये तुफान गर्दी केली आहे.
आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंहने ‘हमजा अली मझारी’ नावाच्या भारतीय गुप्तहेराची भूमिका साकारली आहे, ज्याचा भूतकाळ ‘जसकिरत सिंह रंगी’ या नावाने उलगडतो. आपल्या देशावरील प्रत्येक हल्ल्याचा बदला घेणारा हा गुप्तहेर आणि पाकिस्तानी गुंड ‘रहमान डकैत’ याच्या विरोधातील संघर्ष चित्रपटात अत्यंत चित्तथरारक पद्धतीने मांडण्यात आला आहे. चित्रपटात रणवीर सिंहसोबतच संजय दत्त, अर्जुन रामपाल, राकेश बेदी, सारा अर्जुन आणि दानिश पंडोर यांसारख्या दिग्गज कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारून कथेला वेगळी उंची मिळवून दिली आहे.
‘धुरंधर २: द रिव्हेंज’ हा चित्रपट संपूर्ण भारतात हिंदीसह पाच प्रमुख भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. दुसऱ्या दिवसाच्या कमाईचे विश्लेषण केले असता, एकट्या हिंदी आवृत्तीने ७८.९४ कोटींची कमाई केली आहे, तर तेलगू भाषेतून १.३० कोटींचा व्यवसाय झाला आहे. तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांमधूनही चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. आता पहिल्या शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांमध्ये हा चित्रपट किती कोटींची भर घालतो आणि ३०० कोटींचा आकडा किती लवकर गाठतो, याकडे संपूर्ण चित्रपटसृष्टीचे डोळे लागले आहेत.










