Uddhav Thackeray : राजधानी मुंबईत आयोजित ‘एक्सपोर्ट इम्पोर्ट लॉजिस्टिक’ अभ्यासक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील ज्वलंत विषयांवर आपली रोखठोक भूमिका मांडली. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून त्यांनी सरकारवर सडकून टीका केली. “राज्यातील सर्वच भोंदूबाबांवर कडक कारवाई झाली पाहिजे, मग त्यांच्या हातात कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा का असेना,” अशा शब्दांत ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले.
अशोक खरात प्रकरणातील धक्कादायक खुलाशांवर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आपण नेमक्या कोणत्या पातळीवर जाऊन थांबणार आहोत, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. “महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा अस्तित्वात आहे, मात्र जर कायद्याचे रक्षणकर्तेच अशा भोंदूबाबांच्या आहारी जाणार असतील, तर त्यांच्यावरही कठोर कारवाई होणे गरजेचे आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. राज्याला प्रगतीच्या पथावर नेण्याचे स्वप्न आम्ही पाहत असताना, टाचण्या आणि लिंबू-उतारा यांसारखे विषय समोर येणे हे अत्यंत दुर्दैवी असल्याचेही त्यांनी नमूद केले. ज्यांचे स्वतःचे काही कर्तृत्व नसते, त्यांनाच अशा अघोरी मार्गांचा अवलंब करावा लागतो, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात या भोंदूबाबाला पाणीपुरवठ्यासाठी मदत करण्यात आल्याच्या आरोपांवरही उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, “माझी कोणतीही तक्रार नाही, तुम्ही खुशाल सर्वांची चौकशी करा. हे पाणी नेमके कुठपर्यंत मुरले आहे, हे एकदा जनतेसमोर येऊ द्या.” चौकशीच्या माध्यमातून सत्य बाहेर येणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी पारदर्शक तपासाचे समर्थन केले. खरात प्रकरणावरून लक्ष भरकटवण्यासाठी इतर गोष्टींचा आधार घेतला जात असल्याचा संशयही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आपल्या भाषणाचा समारोप करताना उद्धव ठाकरे यांनी “ओम फट स्वाहा…” असे म्हणत राज्यातील सर्व भोंदूगिरीचा नायनाट करण्याचे आवाहन केले. गावोगावी पसरलेल्या अशा भोंदूबाबांविरुद्ध मोहीम उघडून सामान्य जनतेची फसवणूक थांबवावी, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली.
‘लोकशाहीचाही रेड्यासारखा बळी दिला जातोय’; साताऱ्यातील मारहाणीवरून उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर प्रहार; भूमीपुत्रांसाठी लॉजिस्टिक कोर्सेचा शुभारंभ-
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचारावरून राज्य सरकारवर बोचरी टीका केली आहे. “साताऱ्यात जो प्रकार घडला, त्यावरून आता सर्वांच्या लक्षात येईल की, केवळ मुक्या प्राण्यांचाच नव्हे, तर रेड्याप्रमाणे लोकशाहीचाही बळी दिला जात आहे,” अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. विधिमंडळ अधिवेशनात विरोधकांनी पुराव्यासह भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर काढली असून, ढोंगी प्रवृत्तींवर जे पांघरूण घातले जात आहे, ते मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दूर करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या राजकीय टीकेसोबतच उद्धव ठाकरे यांनी मराठी तरुणांच्या रोजगारासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. २३ जानेवारी रोजी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ झाला, तेव्हाच उद्धव ठाकरे यांनी स्थानिक भूमीपुत्रांसाठी रोजगाराचे दालन उघडण्याचे आश्वासन दिले होते. त्याच आश्वासनाची पूर्तता म्हणून मुंबईत ‘एक्सपोर्ट-इम्पोर्ट लॉजिस्टिक’ या विशेष प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ करण्यात आला. केवळ आंदोलने करून प्रश्न सुटत नाहीत, तर मराठी मुलांना जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी पात्र बनवणे आवश्यक आहे, या उद्देशाने हे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सध्याच्या आधुनिक युगात ‘लॉजिस्टिक’ क्षेत्राचे महत्त्व अफाट वाढले आहे. नवी मुंबईत साकारत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण होणार आहेत. “कंपन्यांना कुशल मनुष्यबळाची गरज असते आणि तिथे आमच्या मराठी मुला-मुलींना संधी नाकारली जाऊ नये, म्हणून आम्ही हे प्रशिक्षण वर्ग सुरू केले आहेत. स्थानिक भूमीपुत्रांसाठी जी दारे बंद होती, ती आता या कौशल्याच्या जोरावर उघडली जातील,” असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष कृतीतून मराठी तरुणांना सक्षम करण्यावर त्यांनी भर दिला.










