Air India : एअर इंडियाने (Air India) आपल्या केबिन क्रूसाठी आरोग्य आणि फिटनेसचे (Fitness) नियम अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. १ मेपासून लागू होणाऱ्या नव्या धोरणानुसार, कर्मचाऱ्यांची नोकरी, कामाचे वेळापत्रक आणि पगार हे त्यांच्या फिटनेसवर, विशेषतः बीएमआय (Body mass index) वर अवलंबून असणार आहेत.
या धोरणात कर्मचाऱ्यांच्या बीएमआयनुसार वर्गीकरण करण्यात येणार आहे. बीएमआय १८ पेक्षा कमी असेल तर तो कमी वजनाचा समजला जाईल. पण अशा कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासणी आणि फिटनेस चाचणी पास करावी लागेल. बीएमआय २५ ते २९.९ दरम्यान असेल तर ते जास्त वजनाच्या गटात येतील. मात्र ते फिटनेस टेस्ट उत्तीर्ण झाल्यास काम सुरू ठेवू शकतात. बीएमआय ३० किंवा त्याहून अधिक असल्यास तो लठ्ठपणाच्या श्रेणीत मोडतो आणि अशा कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे. या गटातील कर्मचाऱ्यांना तात्पुरते कामावरून दूर केले जाऊ शकते आणि त्यांचा पगारही कमी केला जाऊ शकतो. ठरावीक कालावधीत त्यांनी आपले वजन कमी करून योग्य मर्यादेत आणणे आवश्यक असेल. तसेच, जे कर्मचारी फिटनेस चाचणीत अपयशी ठरतील, त्यांनाही पगार कपात आणि कामातून ब्रेक देण्याची शक्यता आहे. हे नियम सध्या कामावर असलेल्या आणि प्रशिक्षण घेत असलेल्या दोन्ही केबिन क्रू सदस्यांना लागू असतील.
एअर इंडियाच्या मते, या निर्णयामागचा उद्देश कर्मचाऱ्यांमध्ये निरोगी जीवनशैलीबद्दल जागरूकता वाढवणे हा आहे. टाटा समूहाने २०२२ मध्ये एअर इंडियाचे अधिग्रहण केल्यानंतर कंपनीत मोठे बदल सुरू आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून हे नवीन धोरण लागू केले जात आहे.
Air India ची आखातातील अडीच हजार उड्डाणे रद्द
मध्यपूर्वेतील युध्दस्थितीमुळे Air India ने मागील तीन आठवड्यांत पश्चिम आशियातील देशांमध्ये जाणारी २,५०० उड्डाणे रद्द केली आहेत.आपल्या क्षमतेच्या केवळ ३० टक्के क्षमतेवर Air India सध्या पश्चिम आशियातील उड्डाणे करत आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्पबेल विल्सन यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी पाठवलेल्या पत्रात दिली आहे.
संपूर्ण जग, पश्चिम आशिया आणि विमान वाहतूक उद्योग मध्यपूर्वेत सध्या सुरू असलेल्या युध्दामुळे निर्माण झालेल्या संकटाशी सामना करत आहे. एअर इंडियाला या युध्दाचा विशेष फटका बसला आहे. कारण पश्चिम आशियातील देशांसाठी Air India ची मोठ्या संख्येने विमान उड्डाणे दररोज होत असतात. युध्दामुळे विमानाच्या इंधनाच्या किंमत दुपटीने वाढ झाली आहे. त्याचा थेट फटका विमान कंपन्यांना बसत आहे. याशिवाय उड्डाणे रद्दही करावी लागत आहेत. युध्द सुरू झाल्यापासून मागील तीन आठवडे आपल्याला सुमारे २ हजार ५०० उड्डाणे रद्द करावी लागली.पश्चिम आशियात सध्या आपण अवघ्या ३० टक्के क्षमतेने काम करत आहोत. कारण हवाई वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.अनेक विमानतळ एकतर बंद आहेत किंवा प्रवाशांच्या दृष्टीने असुरक्षित बनले आहेत. युध्दामुळे संपूर्ण विमान वाहतूक क्षेत्राला जबर आर्थिक फटका बसत आहे. पुढील महिन्यापासून आपल्याला युध्दाचे आणखी तीव्र चटके जाणवू लागतील,असे विल्सन यांनी आपल्या पत्रा म्हटले आहे.









