Maharashtra Kesari : पुण्याच्या वाघोलीतील अजितदादा पवार क्रीडानगरीत आज रात्री झालेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडवर ४-३ असा चुरशीचा विजय मिळवून या स्पर्धेची मानाची चांदीची गदा उचलली. त्यासोबत त्याने ५ लाख रुपयांसह फॉर्च्युनर कार पटकावली. या विजयासह हर्षवर्धनने दुसऱ्यांदा ‘महाराष्ट्र केसरी’ होण्याचा बहुमान मिळवल्याने कुस्ती क्षेत्रात नाशिकच्या शिरपेचात मानाचा नवा तुरा रोवला गेला आहे.
गादीवर खेळवलेल्या या महाअंतिम सामन्यातील पहिल्या फेरीत महेंद्रने हर्षवर्धन सदगीरला रिंगणाच्या बाहेर ढकलून १ गुण मिळवला. त्यानंतर महेंद्र हा हर्षवर्धनच्या चेहेऱ्यावर वारंवार हात मारत होता. त्यामुळे पंचाने महेंद्रविरोधात १ गुण दिला. परिणामी पहिली फेरी १-१ ने बरोबरीत सुटली. दुसऱ्या फेरीत हर्षवर्धनने चांगला खेळ करुन महेंद्रवर पकड मिळवून ४-१ ने आघाडी घेतली. शेवटी हा महाअंतिम सामना हर्षवर्धनने ४-३ असा जिंकून महाराष्ट्र केसरीचे विजेतेपद पटकाविले.
याआधी माती विभागाच्या अंतिम फेरीत हिंगोलीचा अनुभवी सिकंदर शेखवर महेंद्र गायकवाडने ३-० गुणांनी विजय मिळवून महाराष्ट्र केसरीच्या महाअंतिम सामन्यात धडक दिली होती. त्यानंतर गादी विभागाच्या अंतिम फेरीत सोलापूरचा जय पाटील आणि हर्षवर्धन सदगीर भिडले. त्यात हर्षवर्धनने सुरवातीच्या काही मिनिटांत जय पाटीलला १०-० ने पराभूत करुन महाअंतिम सामन्यात प्रवेश मिळवला.









