Gas : मध्य पूर्वेतील युध्दामुळे देशात निर्माण झालेल्या स्वयंपाकाच्या गॅसच्या (एलपीजी) तुटवड्यावर उपाय म्हणून आता केंद्र सरकार घरगुती गॅसच्या 14.2 किलो वजनाच्या सिलिंडरमध्ये 7 ते 10 किलो गॅस भरून पुरवठा करण्याचा विचार करत आहे.
देशात एलपीजीच्या मागणीपैकी तब्बल 60 टक्के एलपीजी परदेशांमधून आयात केला जातो. त्यातील 90 टक्के पुरवठा आखाती देशांमधून होतो. मात्र युध्दामुळे इराणने होर्मुजची सामुद्रधुनी शत्रू राष्ट्रांसाठी बंद केल्यामुळे गेल्या आठवड्यात भारतात एलपीजीची फक्त दोन जहाजे पोहोचू शकली. ही जहाजे देशातील एलपीजीची मागणी पाहता केवळ एक दिवसाचा कोटा पूर्ण करू शकतात.सध्या भारताची सहा मोठी गॅस घेऊन येणारी जहाजे पर्शियाच्या आखातामध्ये (पर्शियन गल्फ) अडकून पडली आहेत. ती सुखरुप पोहोचल्यानंतर काही प्रमाणात गॅसचा तुटवडा कमी होण्याची अपेक्षा आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार जास्ती जास्त लोकांना एलपीजी देता यावा यासाठी 14.2 किलो क्षमतेच्या सिलिंडरमध्ये कमी गॅस भरण्याचा विचार करत आहे. या निर्णयानुसार सिलिंडरमध्ये जेवढा गॅस भरलेला असेल तेवढ्याच गॅसचे पैसे ग्राहकांना द्यावे लागणार आहेत.










