Tata Motors Price Hike: जर तुम्ही टाटा मोटर्सची नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कंपनीने आपल्या सर्व इंटरनल कंबशन इंजिन (ICE) म्हणजेच पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे.
ही दरवाढ 1 एप्रिलपासून लागू होणार आहे. त्यामुळे नवीन आर्थिक वर्षात टाटाची कार खरेदी करणे आता अधिक महाग पडणार आहे.
किमतीत किती होणार वाढ?
टाटा मोटर्सने दिलेल्या माहितीनुसार, कारच्या किमतींमध्ये सरासरी 0.5 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. गाडीचे मॉडेल आणि व्हेरिएंटनुसार हा फरक 2,285 रुपयांपासून ते सुमारे 13,000 रुपयांपर्यंत असू शकतो. सध्या टाटा मोटर्सची सर्वात स्वस्त कार टियागो असून तिची सुरुवातीची किंमत 4.57 लाख रुपये आहे, तर सर्वात महागडी कार सफारीची किंमत 13.29 लाख रुपयांपासून सुरू होते.
दरवाढीचे नेमके कारण काय?
कंपनीने या दरवाढीमागे उत्पादनाचा वाढता खर्च (इनपुट कॉस्ट) हे मुख्य कारण असल्याचे सांगितले आहे. कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ आणि पुरवठा साखळीतील बदलांमुळे हा निर्णय घ्यावा लागला आहे. विशेष म्हणजे केवळ टाटा मोटर्सच नाही, तर मर्सिडीज बेंझ आणि बीएमडब्ल्यू सारख्या लक्झरी कार कंपन्यांनीही 1 एप्रिलपासून आपल्या गाड्यांच्या किमतीत 2 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचे जाहीर केले आहे.
इलेक्ट्रिक वाहनांचे काय?
टाटा मोटर्सने केवळ पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी कारच्या किमती वाढवल्या आहेत. इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) किमतींबाबत कंपनीने सध्या तरी कोणताही बदल जाहीर केलेला नाही. त्यामुळे ईव्ही खरेदी करणाऱ्यांना सध्या तरी दिलासा आहे. मारुती सुझुकी आणि ह्युंदाई सारख्या इतर मोठ्या कंपन्यांनी अद्याप दरवाढीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही, मात्र लवकरच इतर ब्रँड्सही किमती वाढवू शकतात अशी शक्यता आहे.










