Devendra Fadnavis : नाशिकमधील कथित भोंदूबाबा अशोक खरात याच्या पाशवी कृत्यांचा पाढा आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत वाचला. धर्माच्या आणि दैवी अवताराच्या नावाखाली महिलांचे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषण करणाऱ्या खरातने माणुसकीला काळिमा फासल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले. या प्रकरणात आतापर्यंत एकूण आठ गुन्हे दाखल करण्यात आले असून, दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी सभागृहाला दिली.
संमोहन, अघोरी विधी आणि पाशवी अत्याचार-
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक खरात हा स्वतःला ‘दैवी अवतार’ असल्याचे भासवून महिलांना संमोहित करत असे. अघोरी विधींच्या नावाखाली तो महिलांशी अत्यंत अश्लील चाळे करून त्यांचे लैंगिक शोषण करत असे. धक्कादायक बाब म्हणजे, तीर्थाच्या नावाखाली तो पीडित महिलांना आपली लघवी पाजायचा. “जर या प्रकरणाची कुठेही वाच्यता केली, तर दैवी कोप होईल आणि तुझे कुटुंब उद्ध्वस्त होईल,” अशी धमकी देऊन त्याने महिलांचे जगणे असह्य केले होते. सरकारवाडा पोलीस ठाण्यात एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिला गुंगीचे औषध देऊन आणि तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देऊन वारंवार बलात्कार करण्यात आला.
सायबर गुन्हेगारी आणि ‘एसआयटी’चा तपास-
या प्रकरणातील आरोपी केवळ शारीरिक शोषणावरच थांबला नाही, तर त्याने पीडित महिलांचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ बनवून त्यांना ब्लॅकमेलही केले. एका प्रकरणात महिलेचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन पाच कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी नीरज जाधव नावाच्या व्यक्तीने एका महिलेचा ‘एआय’ (AI) तंत्रज्ञानाने तयार केलेला फोटो सोशल मीडियावर प्रसारित केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तो लगेच डिलीट केला. या सर्व प्रकरणांच्या सखोल तपासासाठी ‘एसआयटी’ (SIT) स्थापन करण्यात आली असून, पीडित महिलांचे समुपदेशन करून त्यांची ओळख गुप्त राखत गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे.
४० कोटींची मालमत्ता आणि शस्त्रास्त्रांचा साठा-
अशोक खरातने भोंदूगिरीच्या माध्यमातून अफाट माया जमवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आतापर्यंत त्याची ४० कोटी रुपयांची मालमत्ता समोर आली असून, त्यात ३३ एकर जमीन, फार्म हाऊस, पनवेलमधील ४० गुंठे जमीन, पुण्यातील आलिशान फ्लॅट आणि सिन्नर येथील मंगल कार्यालयाचा समावेश आहे. पोलिसांनी ही सर्व मालमत्ता जप्त केली आहे. याशिवाय, त्याच्या ठिकाणांहून ६ लाख रुपयांची रोख रक्कम, लॅपटॉप, डीव्हीआर, एक रिव्हॉल्व्हर आणि जिवंत काडतुसांसह पाच वापरलेली काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
शिवनिका संस्थान आणि नातेवाईकांची चौकशी-
खरातच्या मालकीच्या ‘शिवनिका संस्थान’ या संस्थेच्या व्यवहारांचीही कसून चौकशी केली जात आहे. त्याच्या नातेवाईकांच्या नावावर असलेली बेनामी मालमत्ता शोधण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणातील आरोपी आणि पीडित महिलांची वैद्यकीय तपासणी पूर्ण झाली असून, संस्थेशी संबंधित पुजारी आणि इतर कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. आतापर्यंत चार पीडित महिला धैर्याने पुढे आल्या असून त्यांच्या तक्रारीवरून पाच स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शासनाची कठोर भूमिका-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, हे प्रकरण केवळ एका भोंदूबाबापुरते मर्यादित नसून, ही एक सामाजिक विकृती आहे. सोशल मीडियावरून पीडित महिलांचे फोटो आणि व्हिडिओ हटवण्यासाठी सायबर पोलिसांचे पथक रात्रंदिवस काम करत आहे. “अशोक खरातला मदत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा शोध घेतला जाईल आणि त्यांना कायद्याच्या चौकटीत कठोर शिक्षा दिली जाईल,” असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.










