SEBI New Rules: शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्या सामान्य नागरिकांची डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाने (SEBI) एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सेबीने गुगल प्ले स्टोअरवरील अधिकृत ब्रोकर्सच्या ट्रेडिंग अॅप्ससाठी ‘व्हेरिफाईड’ (Verified) नावाचा विशेष शिक्का किंवा लेबल सादर केले आहे.
सध्या बाजारात अधिकृत अॅप्ससारखेच दिसणारे अनेक बनावट अॅप्स उपलब्ध असून, त्याद्वारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
बनावट अॅप्सना बसणार लगाम
अनेकदा फसवणूक करणारे लोक अधिकृत ब्रोकर्सच्या अॅप्सची हुबेहूब नक्कल करून बनावट अॅप्स तयार करतात. या अॅप्सच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढले जाते आणि त्यांची कष्टाची कमाई लांबवली जाते. सेबीने दिलेल्या माहितीनुसार, हे लेबल केवळ सेबीकडे नोंदणीकृत असलेल्या संस्थांच्या अॅप्सनाच दिले जाईल. यामुळे गुंतवणूकदारांना खऱ्या आणि खोट्या अॅप्समधील फरक एका नजरेत ओळखता येईल. आगामी काळात हे फिचर इतर मध्यस्थांच्या अॅप्ससाठीही उपलब्ध करून दिले जाणार आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर
सेबीचे अध्यक्ष तुहिन कांत पांडे यांनी या उपक्रमाच्या लाँचिंगवेळी सांगितले की, नियम धाब्यावर बसवून संशयास्पद योजनांचा प्रचार करणाऱ्या ‘फिनफ्लुएन्सर्स’वर (Finfluencers) लक्ष ठेवण्यासाठी गुगलला ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा (AI) वापर करण्यास सांगण्यात आले आहे. जे लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीची माहिती पसरवून गुंतवणूकदारांचे नुकसान करत आहेत, त्यांना डिजिटल प्लॅटफॉर्मवरून बाहेर काढण्यासाठी कठोर पावले उचलली जातील.
आतापर्यंतची मोठी कारवाई
सेबीने आतापर्यंत डिजिटल प्लॅटफॉर्मवरून गुंतवणूकविषयक १.३ लाखांहून अधिक दिशाभूल करणारे मजकूर हटवले आहेत. तसेच, सुमारे ६६ बनावट ट्रेडिंग अॅप्स ओळखले असून ते अॅप स्टोअरवरून काढून टाकण्यात आले आहेत. गुगल प्ले स्टोअरचे व्यवस्थापकीय संचालक आदित्य स्वामी यांच्या मते, नवीन प्रणाली अंतर्गत आतापर्यंत ६०० हून अधिक ट्रेडिंग अॅप्सची पडताळणी पूर्ण झाली आहे.
अशी होते गुंतवणूकदारांची फसवणूक
फसवणूक करणारे लोक सोशल मीडिया किंवा मेसेजिंग अॅप्सच्या माध्यमातून गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवतात. त्यानंतर ते अधिकृत अॅप्सशी साधर्म्य असणारे बनावट अॅप्स डाऊनलोड करायला लावतात. गुंतवणूकदाराला वाटते की तो शेअर मार्केटमध्ये पैसे लावत आहे, पण प्रत्यक्षात ते पैसे भामट्यांच्या खात्यात जमा होत असतात. ही फसवणूक लक्षात येईपर्यंत गुंतवणूकदाराने मोठी रक्कम गमावलेली असते. या सर्व प्रकारांना आळा घालण्यासाठी सेबीने आता माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि दूरसंचार विभागाशीही हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला आहे.












