Financial Changes July 2026: जून महिना आता संपत आला असून १ जुलैपासून नवीन महिन्याची सुरुवात होत आहे. दर महिन्याप्रमाणेच या वेळेस देखील पहिल्या तारखेपासून देशात अनेक महत्त्वाचे आर्थिक आणि व्यावहारिक नियम बदलणार आहेत. या नवीन नियमांमध्ये सर्वसामान्यांच्या खिशाशी निगडित असलेल्या अनेक गोष्टींचा समावेश आहे.
या बदलांमध्ये आधार कार्ड मोफत अपडेट करण्याच्या सुविधेपासून ते क्रेडिट कार्ड, रेल्वेचे नियम, नवीन कारच्या किमती आणि आयटीआर (ITR) भरण्याच्या अंतिम मुदतीचा समावेश आहे. या ८ मोठ्या बदलांविषयी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.
१. आधार कार्डवर ईमेल अपडेट आता मोफत
आधार कार्ड धारकांसाठी नवीन महिन्यापासून एक मोठी दिलासादायक बातमी आहे. १ जुलैपासून जर तुम्हाला तुमच्या आधार कार्डवर ईमेल आयडी अपडेट करायचा असेल, तर तुम्ही आधार अॅपच्या माध्यमातून हे काम पूर्णपणे मोफत करू शकाल. यापूर्वी या सुविधेसाठी ७५ रुपये मोजावे लागत होते, मात्र आता हा खर्च वाचणार आहे.
२. विनातिकीट रेल्वे प्रवाशांवर होणार कडक कारवाई
भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि शिस्तीसाठी नियम अधिक कडक केले आहेत. केंद्र सरकारच्या एका नव्या प्रस्तावाला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली असून, हा नियम १ जुलैपासून लागू होण्याची शक्यता आहे. या नव्या नियमांनुसार विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या दंडाच्या रक्कमेत मोठी वाढ केली जाणार आहे. तसेच रेल्वे परिसर आणि गाड्यांमध्ये गोंधळ घालणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.
३. एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती आणि पीएनजीचा नियम
गॅस कनेक्शन वापरणाऱ्या ग्राहकांसाठी दोन महत्त्वाच्या अपडेट्स आहेत:
- कनेक्शन रद्द होण्याची भीती: ज्या ग्राहकांकडे एलपीजी आणि पीएनजी (पाईप गॅस) असे दोन्ही कनेक्शन आहेत, त्यांना ९० दिवसांच्या आत पीएनजीवर शिफ्ट होण्याची मुदत ३० जून रोजी संपत आहे. जर ग्राहक शिफ्ट झाले नाहीत, तर त्यांचे गॅस कनेक्शन आणि पुरवठा बंद केला जाऊ शकतो.
- किमतींमध्ये दिलासा मिळण्याची शक्यता: मध्य पूर्व आशियातील तणाव कमी झाल्यामुळे आणि होर्मुझची समुद्रधुनी वाहतुकीसाठी खुली झाल्यामुळे ऊर्जा संकट कमी झाले आहे. त्यामुळे १ जुलै रोजी सरकार घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती कमी करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याची दाट शक्यता आहे.
४. आयटीआर (ITR) भरण्याची अंतिम मुदत
आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी आयटीआर-१ आणि आयटीआर-२ फॉर्म भरणाऱ्या करदात्यांसाठी एक महत्त्वाची आठवण आहे. प्राप्तिकर परतावा (इन्कम टॅक्स रिटर्न) भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२६ आहे. ही मुदत चुकल्यास करदात्यांना मोठा दंड भरावा लागू शकतो, तसेच काही विशेष टॅक्स सिस्टीम निवडण्यावर बंदी येऊ शकते.
५. पासपोर्ट बनवणे होणार महाग
परदेशात जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी हा एक झटका आहे. परराष्ट्र मंत्रालयाने १ जुलै २०२६ पासून नॉर्मल आणि तात्काळ अशा दोन्ही प्रकारच्या पासपोर्टसाठी सेवा शुल्कात (सर्व्हिस फी) वाढ केली आहे. त्यामुळे आता नवीन पासपोर्ट काढण्यासाठी किंवा नूतनीकरण करण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतील.
६. क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल
- SBI क्रेडिट कार्ड: १ जुलैपासून काही ठराविक फोनपे एसबीआय क्रेडिट कार्डच्या रिवॉर्ड पॉईंट्सच्या मर्यादेत बदल होत आहे. नव्या नियमांनुसार कोणत्या व्यवहारांवर रिवॉर्ड पॉईंट्स मिळणार नाहीत, याची एक मोठी यादी जाहीर करण्यात आली आहे.
- HDFC क्रेडिट कार्ड: एचडीएफसी बँकेच्या कार्डधारकांना आता प्रत्येक कॅलेंडर त्रैमासिकात (क्वार्टर) ३ वेळा मोफत डोमेस्टिक एअरपोर्ट लाँजचा वापर करता येईल. मात्र, यासाठी ग्राहकांनी मागील त्रैमासिकात किमान ६०,००० रुपये खर्च केलेले असणे बंधनकारक आहे.
७. ईपीएफओ ३.० (EPFO 3.0) होणार लाँच
श्रम आणि रोजगार मंत्रालयाकडून जुलैच्या सुरुवातीला ईपीएफओ ३.० ची नवीन आवृत्ती लाँच केली जाऊ शकते. या नवीन अपग्रेडेशनमुळे खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या पीएफ (PF) मधील पैसे थेट युपीआय (UPI) किंवा एटीएम (ATM) च्या माध्यमातून अत्यंत सोप्या पद्धतीने काढता येतील.
८. नवीन कार खरेदी महागणार
जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर १ जुलैपासून तुम्हाला खिसा अधिक रिकामा करावा लागेल:
टाटा मोटर्स (Tata Motors): टाटा कंपनी देखील आपल्या पेट्रोल-डिझेल (ICE) आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) किमती १.५ टक्क्यांपर्यंत वाढवणार आहे.
किआ मोटर्स (KIA): या कंपनीने आपल्या कारच्या किमतीत २ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे.










