Mohit Kamboj Daughter Birthday Party : भारतीय जनता पक्षाचे धडाडीचे नेते आणि प्रसिद्ध उद्योजक मोहित कंबोज यांची कन्या मिश्का कंबोज हिचा सोळावा वाढदिवस नुकताच मुंबईतील एका आलिशान पंचतारांकित हॉटेलमध्ये अत्यंत शाही थाटात साजरा करण्यात आला. या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे, राजकीय मैदानात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जाणारे नेते सर्व हेवेदावे विसरून एकाच छताखाली एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. या सोहळ्यातील उपस्थितीने केवळ मुंबईतच नव्हे, तर संपूर्ण राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आणले आहे.
या सोहळ्यातील सर्वात लक्षवेधी उपस्थिती ठरली ती म्हणजे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची. महाविकास आघाडीच्या काळात मोहित कंबोज आणि ठाकरे गटामध्ये अत्यंत तीव्र राजकीय संघर्ष आणि वाकयुद्ध रंगलेले संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. मात्र, या घरगुती कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांच्यासह हजेरी लावल्याने राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कंबोज आणि ठाकरे यांच्यातील हा स्नेह केवळ कौटुंबिक आहे की भविष्यातील नव्या राजकीय समीकरणांची ही नांदी आहे, यावर आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.
शिवाय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनीही मिश्का हिला शुभाशीर्वाद दिले. याव्यतिरिक्त, रिलायन्स समूहाचे अनंत अंबानी आणि त्यांच्या पत्नी राधिका मर्चंट यांच्या विशेष उपस्थितीने या सोहळ्याची शान अधिकच वाढवली. अंबानी कुटुंबाच्या हजेरीमुळे या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्तरावर महत्त्व प्राप्त झाले.
केवळ राजकारणच नव्हे, तर चित्रपटसृष्टीतील अनेक बड्या कलाकारांनीही या महोत्सवाला ‘चार चाँद’ लावले. बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान याने आपल्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले, तर अभिनेता रणवीर सिंह याने आपल्या गाण्यांवर दमदार नृत्य सादरीकरण करून उपस्थितांचे मनोरंजन केले. ज्येष्ठ अभिनेता संजय दत्त, सुनील शेट्टी, शिल्पा शेट्टी आणि अमृता अरोरा यांसारख्या प्रसिद्ध सेलिब्रिटींनी या सोहळ्याला हजेरी लावून कंबोज कुटुंबाचा आनंद द्विगुणित केला.











