Uddhav Thackeray vs Omraje Nimbalkar: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोरी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केलेल्या 6 खासदारांच्या मतदारसंघात जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यवतमाळ, वाशिम आणि हिंगोली या जिल्ह्यांचा झंझावाती दौरा पूर्ण केल्यानंतर, 28 जून रोजी धाराशिव जिल्ह्यात उद्धव ठाकरेंची भव्य जाहीर सभा पार पडली.
या सभेत बोलताना त्यांनी स्थानिक खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत निशाणा साधला. तसेच पक्षफुटीच्या वेळेस पडद्यामागे नेमके काय घडत होते, याबाबात एक खळबळजनक गौप्यस्फोट केला.
उद्धव ठाकरे यांनी जाहीर मंचावरून बोलताना स्पष्ट केले की, ओमराजे निंबाळकर यांना त्यांनी धाराशिवच्या जनतेचा हक्काचा उमेदवार म्हणून निवडणूक मैदानात उतरवले होते, मात्र त्यांनी जी गद्दारी केली, त्याची आता लाज वाटत आहे. सध्या सुरू असलेला हा सर्व प्रकार जनतेची शुद्ध फसवणूक असल्याचे त्यांनी म्हटले.
“चार्टर्ड विमानाने फिरतात, एवढे पैसे आले कुठून?”
बंडखोर खासदारांच्या जीवनशैलीवर आणि त्यांनी दिलेल्या निधीच्या कारणावर उद्धव ठाकरेंनी तीव्र आक्षेप घेतला, सध्या सोशल मीडियावर बंडखोर खासदारांचे अनेक व्हिडिओ आणि रिल्स व्हायरल होत आहेत. एकाच खाजगी चार्टर्ड विमानात परभणी, हिंगोली, यवतमाळ आणि धाराशिवचे खासदार एकत्र फिरत आहेत. यांना या विमाना प्रवासासाठी एवढे पैसे नक्की कोणी दिले, असा थेट सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.
आई तुळजाभवानीच्या पवित्र जिल्ह्यात ही गद्दारी झाली असून, बंडखोरांनी विकासाच्या निधीचे जे कारण पुढे केले आहे, ते खोटे आहे. हा निधी जनतेच्या भल्यासाठी नसून केवळ त्यांच्या स्वतःच्या आर्थिक स्वार्थासाठी मिळवला गेला आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
त्या रात्री नेमकं काय घडलं होतं? ठाकरेंनी उघड केला बैठकीचा ‘तो’ प्रसंग
पक्षाच्या खासदारांची बंडखोरी होण्यापूर्वी मातोश्रीवर बोलावलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या बैठकीचा प्रसंग उद्धव ठाकरेंनी सभेत जाहीर केला. त्या अंतिम बैठकीला उपस्थित न राहण्यासाठी ६ खासदारांनी कशी वेगवेगळ्या घरगुती अडचणींची कारणे दिली होती, याचा पाढाच त्यांनी वाचला:
- यवतमाळचे खासदार: माझ्या मुलीच्या लग्नाची (सोयरीक) बोलणी सुरू असल्याचे कारण त्यांनी दिले.
- हिंगोलीचे खासदार: माझा मुलगा निवडणूक लढवत असून तिथे व्यस्त असल्याचे सांगितले.
- शिर्डीचे खासदार: पत्नी आजारी असल्याचे कारण पुढे करून बैठकीला येणे टाळले.
- धाराशिवचे खासदार (ओमराजे): माझा मुलगा रुग्णालयात दाखल असल्याचे कारण त्यांनी दिले.
उद्धव ठाकरेंनी सांगितले की, मी मोठ्या मनाने या सर्व खासदारांना बैठकीला न येण्याची सवलत दिली. मात्र, जेव्हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद सुरू झाला, तेव्हा स्क्रीनवर ओमराजे निंबाळकर यांचा चेहरा पाहून माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती.
उद्धव ठाकरेंचे थेट विधान: “व्हिडिओ कॉलवर ओमराजेंचा चेहरा पाहिल्यावर मी त्यांना थेट विचारले होते की, तुमचा चेहरा एवढा पडलेला का दिसतोय? काही ताणतणाव आहे का, की रात्री झोप लागली नाही? त्यावर त्यांनी सर्व काही आलबेल असल्याचे सांगितले. मात्र, त्यांचा चेहरा स्वच्छ नव्हता, त्यांच्या मनात तेव्हाच पाप चालले होते, हे मला त्याच क्षणी कळाले होते.”
या सभेमुळे धाराशिवसह संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात थेट आव्हान दिले आहे.










