Home / महाराष्ट्र / Rupali Chakankar Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरण: रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ; २४ तास उलटूनही चौकशीला गैरहजर

Rupali Chakankar Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरण: रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ; २४ तास उलटूनही चौकशीला गैरहजर

Rupali Chakankar Ashok Kharat Case : स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी असलेल्या कथित संबंधांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या...

By: Team Navakal
Rupali Chakankar Ashok Kharat Case
Social + WhatsApp CTA

Rupali Chakankar Ashok Kharat Case : स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी असलेल्या कथित संबंधांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. या प्रकरणाचे पडसाद इतके उमटले की, चाकणकर यांना सर्वप्रथम राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि त्यानंतर पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र, केवळ पदाचा त्याग करून हे प्रकरण शमण्याची चिन्हे नसून, आता त्यांच्या पाठीमागे विशेष तपास पथकाचा (SIT) चौकशीचा ससेमिरा लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एसआयटीचे समन्स आणि चौकशीचे स्वरूप:
अशोक खरात याच्याशी संबंधित ‘शिवनिका संस्थान’च्या आजी-माजी विश्वस्तांसह रुपाली चाकणकर यांनाही चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. आज या प्रकरणी त्यांची प्रत्यक्ष चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती; मात्र, प्राप्त माहितीनुसार चाकणकर आज एसआयटीसमोर हजर राहणार नसल्याचे समजते. असे असले तरी, तपास यंत्रणांनी आता तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आपली पकड घट्ट करण्यास सुरुवात केली आहे.

मोबाईल डेटा आणि आर्थिक व्यवहारांवर लक्ष-
तपासाचा मुख्य केंद्रबिंदू आता अशोक खरातच्या मोबाईलमधील डेटावर स्थिरावला आहे. एसआयटीकडून खरातचे कॉल रेकॉर्ड्स (CDR), व्हॉट्सॲप चॅट्स आणि विविध संशयास्पद आर्थिक व्यवहारांची बारकाईने तपासणी केली जात आहे. या तांत्रिक माहितीच्या आधारे खरातच्या संपर्कात कोणकोणते मोठे चेहरे होते आणि त्यांच्यात नेमकी कसली देवाणघेवाण झाली, याचे नवीन धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. या ‘क्रॉस चौकशी’ (Cross Verification) मधून अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

अशोक खरात प्रकरण: २४ तास उलटूनही रुपाली चाकणकर एसआयटीसमोर अनुपस्थित-
राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना विशेष तपास पथकाने (SIT) चौकशीसाठी समन्स बजावून २४ तासांहून अधिक काळ लोटला आहे; मात्र, अद्यापही त्या चौकशीसाठी हजर झालेल्या नाहीत. चाकणकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून खरात किंवा त्याच्या संस्थेला (ट्रस्टला) काही अवाजवी लाभ मिळवून दिला आहे का, याचा शोध एसआयटीला घ्यायचा आहे. परंतु, वारंवार समन्स बजावूनही चाकणकर यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने, त्या नाशिकला हजर होणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

महिला आयोगाच्या अधिकारांचा खरातसाठी वापर?
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, अशोक खरातच्या सांगण्यावरून महिला आयोगाने पोलीस तपासात हस्तक्षेप केल्याचा संशय बळावला आहे. शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्या संदर्भात महिला आयोगाने अत्यंत तत्परतेने सुनावणी लावली होती. एका पीडित महिलेने नीरज जाधव विरोधात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात खरातच्या सूचनेवरून महिला आयोगाने शिर्डी पोलिसांना चक्क नोटीस पाठवून १७ मार्च रोजी सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते, अशी माहिती समोर येत आहे.

पोलीस अहवाल आणि तांत्रिक गुंतागुंत-
विशेष म्हणजे, शिर्डी पोलिसांनी फेब्रुवारीमध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच, म्हणजेच ५ आणि ९ मार्च रोजी महिला आयोगाकडून सखोल चौकशी आणि सुनावणी घेण्याबाबतची पत्रे धाडण्यात आली होती. मात्र, या प्रकरणाचा तपास आधीच ‘एसआयटी’कडे सोपवण्यात आला असल्याने, शिर्डी पोलिसांनी तसा स्पष्ट अहवाल महिला आयोगाला सादर केला होता. तरीही आयोगाने या विषयात दाखवलेली अतिरिक्त सक्रियता आता रुपाली चाकणकर यांच्यासाठी अडचणीची ठरू लागली आहे.

अशोक खरातच्या पोलीस कोठडीत १ एप्रिलपर्यंत वाढ; ‘तपास निष्पक्षपणे सुरू’-देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण
अशोक खरातवर असलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या आणि मोठ्या आर्थिक फसवणुकीच्या आरोपांमुळे या तपासाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, तपास सुरू झाल्यापासून अनेक नवीन पीडित महिला धैर्याने पुढे येत असून त्यांनी खरातच्या कृत्यांविरुद्ध तक्रारी दिल्या आहेत. या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांचे जाळे केवळ नाशिकपुरते मर्यादित नसून त्याचे धागेदोरे राज्याच्या विविध भागांत पसरलेले आहेत. त्यामुळेच, वाढीव कोठडीच्या काळात खरातची कसून चौकशी करून या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्याचे मोठे आव्हान तपास यंत्रणांसमोर आहे.

देवेंद्र फडणवीस यांची सावध आणि स्पष्ट भूमिका-
या प्रकरणातील राजकीय कनेक्शन आणि रुपाली चाकणकर यांना बजावण्यात आलेल्या समन्सबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. फडणवीस यांनी स्पष्ट केले की, “अशोक खरात प्रकरणाची चौकशी पूर्णपणे निष्पक्षपातीपणे आणि कोणत्याही दबावाशिवाय सुरू आहे. रुपाली चाकणकर यांना नेमक्या कोणत्या कारणासाठी समन्स दिले आहे, याची तांत्रिक माहिती सध्या माझ्याकडे नसली तरी, पोलीस आपली जबाबदारी चोख पार पाडत आहेत.”

तपासाच्या गोपनीयतेबाबत बोलताना ते पुढे म्हणाले की, “अशा संवेदनशील प्रकरणांची दररोज माहिती सार्वजनिक केली जात नाही. तपास यंत्रणांना जेव्हा आवश्यकता वाटते, तेव्हाच त्याबद्दलची माहिती घेतली जाते. सध्यातरी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, योग्य वेळ येताच सर्व वस्तुस्थिती आणि नेमकी माहिती जनतेसमोर ठेवली जाईल.”

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या