Protein Condom : सध्याच्या डिजिटल युगात आरोग्य निरोगी राखण्यासाठी आणि शरीरसौष्ठव कमावण्यासाठी बाजारपेठेत विविध प्रकारची पूरक आहार उत्पादने (Supplements) उपलब्ध आहेत. जिममध्ये जाणाऱ्या युवकांसाठी ‘प्रोटीन पावडर’, ‘प्रोटीन बार’ आणि ‘शेक’ या गोष्टी आता नवीन राहिलेल्या नाहीत. मात्र, नुकताच समाजमाध्यमांवर एका अजब उत्पादनाचा दावा करण्यात आला असून, त्यामुळे इंटरनेटवर तर्कवितर्कांना उधाण आले आहे. जगप्रसिद्ध फिटनेस इन्फ्लुएन्सर गौरव तनेजा याच्या ‘बीस्ट लाईफ’ (Beast Life) या ब्रँडने जगात प्रथमच ‘प्रोटीन कंडोम’ बाजारात आणल्याचा दावा केल्याने नेटकऱ्यांमध्ये संभ्रमाचे आणि कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले आहे.
‘बीस्ट लाईफ’ या ब्रँडचे विविध सप्लीमेंट्स आधीच बाजारपेठेत आपले स्थान टिकवून आहेत. मात्र, इन्स्टाग्रामवर करण्यात आलेल्या एका ताज्या पोस्टमध्ये या ‘प्रोटीन कंडोम’चा उल्लेख करण्यात आला असून, त्याद्वारे शारीरिक कार्यक्षमता (Performance) वाढवण्याबाबत भाष्य करण्यात आले आहे. ही पोस्ट वाऱ्यासारखी व्हायरल झाली असून एक्स, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर या उत्पादनाचे फोटो मोठ्या प्रमाणावर सामायिक केले जात आहेत. अनेकांनी यावर मिश्किल प्रतिक्रिया दिल्या असून, काहींनी याला जागतिक स्तरावरील एक क्रांती मानले आहे, तर काहींनी या कल्पनेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
विशेष म्हणजे, उद्या १ एप्रिल म्हणजेच ‘एप्रिल फूल’चा दिवस असल्याने हा केवळ एक विपणन धोरणाचा (Marketing Strategy) भाग किंवा विनोद असावा, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. अनेक कंपन्या आपल्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी अशा प्रकारचे विचित्र आणि अशक्य वाटणारे दावे करून जाहिरातबाजी करत असतात. त्यामुळे हा ‘प्रोटीन कंडोम’ खरोखरच विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे की केवळ एक चेष्टा आहे, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टता मिळालेली नाही. इतर कोणत्याही नामांकित गर्भनिरोधक उत्पादक कंपनीने अद्याप अशा प्रकारच्या प्रोटीनयुक्त उत्पादनाचा दावा केलेला नाही.










