Kishori Pednekar slams Neelam Gorehe – भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोर्हे यांचे नाव आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी गोर्हेंवर गंभीर आरोप करत, मंत्रिपदासाठी त्या खरातला भेटल्या असल्याचा दावा केला. मात्र, आपले कुटुंबच कधीही, कोणत्याही जिवंत बाबाकडे कधी गेले नाही, मी खरातकडे कधी गेले नाही, असे स्पष्ट करत नीलम गोर्हे यांनी हे आरोप काल फेटाळून लावले. त्यानंतर आज उबाठाच्या ज्येष्ठ नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी नीलम गोर्हे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीची टीका केली.
खरातशी संबंध या मूळ टीकेला प्रत्युत्तर न देता पेडणेकर यांनी खासगी पातळीवर टीका केली. नीलम गोर्हेंचे हृदय काळे असून, त्यांनी पक्षासाठी शून्य काम केले आहे. ती खोटारडी बाई असून, जिथे पाव तिकडे धाव, अशी त्यांची कार्यपद्धती आहे, अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली.
किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, उद्धवजींनी या पडलेल्या धोंड्याला विधान परिषदेची आमदारकी देऊन 24 वर्षे पक्षाने त्यांना एवढा मान-सन्मान दिल्यानंतरही त्यांनी पक्षासाठी शून्य काम केले. ‘जिथे पाव तिकडे धाव’, अशी या बाईंची वागणूक आहे. नाव गोर्हे आणि काम मात्र काळे. इतक्या काळ्या हृदयाने भरलेली बाई मी कधीच पाहिली नाही. 1983 पासून मी शिवसेनेत काम करत आहे.
1990 सालानंतर आम्हाला पदे मिळाली. नंतर गोर्हे बाईंचा शिरकाव झाला. तेव्हापासून बाईला बघत आहे. पक्षात काम शून्य आहे. माझा प्रोटोकॉल, मी, मला कसे आणि मला काय, यापलीकडे बाईंची धाव नाही.किशोरी पेडणेकर पुढे म्हणाल्या की, अत्याचार झालेल्या ठिकाणी आम्हीही गेलो होतो. पण, गोर्हे आमदार असल्याने जास्त नावारूपाला आल्या.
धुळे येथे झालेल्या अत्याचाराच्या घटनेत आम्ही त्यांच्या सोबतच होतो. पण त्या नेहमी सर्व गोष्टी बाजूला ठेवून फक्त स्वतःला कसे महत्त्व मिळेल, याचाच विचार करत असतात. आज जेव्हा सर्व गोष्टी त्यांच्या समोर येऊ लागल्या आहेत, तेव्हा कॅप्टन खरात यांच्याशी संबंधित विविध प्रकारही समोर येत आहेत.
महिलांवरील अत्याचाराचे प्रकार तर आहेतच, पण मंत्रिपद कसे मिळवून द्यायचे, त्यासाठी रक्त कसे वाहायचे, हे लाभ करून घेण्यासाठी अनेकजण खरातला भेटले आहेत. दीपक केसरकर यांनी तर 39 जण भेटल्याचा भांडाफोडच केला. त्या 39 जणांमध्ये या एक असाव्यात, म्हणजे आता प्रश्न उरतो 38 जण कोण आहेत?
गोर्हेंनी विधान परिषदेत निरोप समारंभाच्या भाषणात उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यावर पेडणेकर म्हणाल्या की, गेल्या आठवड्यात या बाईने ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वक्तव्य केले, त्यावरून त्यांना
स्वतःलाच माहीत आहे की, आता त्यांच्यावर थू-थू होणार आहे आणि वर म्हणतात की, मला ट्रोल केले जाईल, पण खरे तर त्या ट्रोल होण्याच्या लायकीच्याही नाहीत.
तुम्ही ज्या सभागृहात गेलात, त्याची गरिमा एवढी खाली आणलेली विधानसभा कोणी पाहिली नव्हती. 20 जून 2022 रोजी सभागृहाने ते पाहिले आणि मग एकेक उड्या पडत गेल्या. त्या उड्यांमध्ये या बाईंची उडी होती. त्या म्हणायच्या आम्हाला उद्धव ठाकरे भेटत नव्हते. परंतु, मी जेव्हा मुख्यमंत्री बंगला किंवा मातोश्रीवर जायचे तेव्हा ही बाई आम्हाला थांबवायची आणि म्हणायची की, थांबा, उद्धवजी जरा व्यग्र आहेत.
जर उद्धवजी भेटत नव्हते, तर तुला कसे कळले की ते व्यस्त आहेत? मी कार्यकर्ती म्हणून सांगते ही बाई एक नंबरची खोटारडी आहे. बुद्धी आणि चातुर्य आहे, पण ते तिने फक्त स्वतःसाठी वापरले. पक्षासाठी त्याचा काहीच उपयोग झाला नाही. श्रमदानही तिने कधी केले नाही.
किशोरी पेडणेकर आणखी म्हणाल्या की, मी एकदा त्यांच्या गाडीत होते. एका पोलिसाने फक्त उठून सलाम केला नाही, त्याचे लक्ष नव्हते. त्या सरळ केबिनमध्ये गेल्या, फोन लावला, त्याला वर बोलावले, त्याच्या वरिष्ठालाही बोलावले आणि त्याला बोलल्या. तेव्हा मला जाणवले की, यांचा अहंकार खूप मोठा आहे. यांना मान-सन्मान हवा होता आणि जेव्हा कळले की, आता हे उद्धवजींकडून मिळत नाही, कदाचित मिळणार नाही, तेव्हा उडी एकनाथ शिंदेकडे घेतली.
आता मग लोकांना प्रश्न पडतो की उंदीर कोण आणि मांजर कोण? साक्ष कोण कोणाची काढते? या बाईवर बोलावे तेवढे कमीच आहे. आता सामोरी जा. तुझे पुरावे बाहेर येत आहेत आणि ते दाखवले जात आहेत. कॅप्टननी तुम्हाला चांगली कॅप्टनशिप दिली. आता तुम्ही कॅप्टनकडे जाऊन काय काय केले, ते कॅप्टनच सांगेल. आम्हाला काही माहिती नाही.
पेडणेकर म्हणाल्या की, मुळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निरोप समारंभाच्या वेळी जे करतात, त्याला जर तुम्ही स्वतःचे क्रेडिट मानत असाल, तर त्यावरूनच कळते किती अज्ञान आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी सर्वांसाठी केले, तुमच्यासाठीही केले. आम्हाला पोटदुखीचा प्रश्न नाही. तुमचेच पोट एवढे आहे की ते भरत नाही. त्यामुळे पोटदुखीचा प्रश्नच येत नाही.
हे देखील वाचा –
इराणवर होणार अणुहल्ला? संयुक्त राष्ट्राच्या अधिकाऱ्याचा दावा; दिला पदाचा राजीनामा










