Banking Rules Change : नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात १ एप्रिलपासून होत असून, यासोबतच कर्ज, क्रेडिट स्कोअर आणि वारसदार (नॉमिनी) यांच्याशी संबंधित अनेक नियमांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) बँकिंग आणि कर्ज व्यवहार क्षेत्रात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी या सुधारणा केल्या आहेत. हे नवीन नियम कर्जदारांसाठी दिलासादायक ठरणार असून, यामुळे बँका आणि ग्राहक यांच्यातील विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होईल.
१ एप्रिल २०२६ पासून होणारे महत्त्वाचे बदल:
1. सिबिल स्कोअर आता दर आठवड्याला अपडेट होणार: आतापर्यंत तुमचा क्रेडिट स्कोअर महिन्याभरात एकदा अपडेट होत असे, मात्र आता तो दर ७ दिवसांनी म्हणजेच महिन्याच्या ७, १४, २१ आणि २८ तारखेला अपडेट केला जाईल. यामुळे जर तुम्ही कर्जाचे हप्ते वेळेवर भरले, तर तुमचा स्कोअर लवकर सुधारेल. मात्र, हप्ता भरण्यास उशीर झाला तर त्याचा परिणामही लगेच दिसून येईल.
2. कर्ज मुदतीपूर्वी फेडल्यास शुल्कातून सुटका: होम लोन, कार लोन, पर्सनल लोन किंवा एज्युकेशन लोन घेतलेल्यांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. नवीन नियमांनुसार, फ्लोटिंग रेटवर घेतलेले कर्ज जर तुम्हाला मुदतीपूर्वी पूर्ण फेडायचे असेल (प्रीपेमेंट किंवा फोरक्लोजर), तर त्यावर बँक कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारू शकणार नाही. सध्या अनेक बँका स्वतःच्या बचतीतून कर्ज फेडणाऱ्या ग्राहकांकडून दंड वसूल करतात, जो आता बंद होईल.
3. एका खात्यात आता ४ वारसदार जोडता येणार: बँक खाते आणि लॉकर सुरक्षित ठेवण्यासाठी आता ग्राहकांना एकापेक्षा जास्त म्हणजेच जास्तीत जास्त ४ वारसदार (नॉमिनी) जोडण्याची सुविधा मिळणार आहे. यामुळे भविष्यात कुटुंबातील सदस्यांना मालमत्ता हाताळणे सोपे होईल.
4. सोन्याच्या व्यापाऱ्यांसाठी दिलासा: ज्वेलरी व्यावसायिकांसाठी गोल्ड मेटल लोनची परतफेड करण्याची मुदत १८० दिवसांवरून वाढवून २७० दिवस करण्यात आली आहे. यामुळे व्यापाऱ्यांकडील रोख रकमेचा ओघ सुधारण्यास मदत होईल.
5. चांगल्या स्कोअरवर स्वस्त कर्ज: ज्या ग्राहकांचा सिबिल स्कोअर उत्तम आहे, त्यांना आता बँकांकडून कमी व्याजदरात कर्ज मिळण्याची शक्यता वाढली आहे. यामुळे शिस्तबद्ध आर्थिक व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना स्वस्त दरात कर्ज मिळवणे सोपे होईल.










