Donald Trump : युद्ध सुरू होऊन 33 दिवस उलटले तरी नमते घेण्यास तयार नसलेल्या इराणमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हतबल झाले आहेत. मित्र राष्ट्रांनी मदत करण्यास स्पष्ट नकार दिल्याने एकाकी पडलेले ट्रम्प या युद्धातून माघार घेण्याच्या मनस्थितीत आले आहेत अशी चर्चा आहे. भारतीय वेळेनुसार उद्या सकाळी सहा वाजता ट्रम्प देशवासियांना संबोधित करणार आहेत. यावेळी ते युद्ध समाप्तीची घोषणा करतील अशी दाट शक्यता आहे. यामुळे उद्याच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
युद्ध सुरू झाल्यापासून ट्रम्प यांनी अनेक उलटसुलट दावे केले आहेत. इराणची पूर्ण लष्करी ताकद आम्ही नष्ट केली आहे, इराणकडे आता नौदलही शिल्लक राहिलेले नाही, इराणचे सर्व प्रमुख नेते ठार झाले आहेत, युद्धात आमचा विजय झाला आहे, इराणवर हल्ला करण्यासारखे आता काहीही शिल्लक राहिलेले नाही, अशा प्रकारचे दावे ट्रम्प यांनी केले. मात्र त्याचवेळी इराण पूर्ण ताकदीनिशी इस्रायल आणि आखाती देशांमधील अमेरिकेच्या तळांवर क्षेपणास्त्र डागत राहिला. त्यामुळे ट्रम्प यांचे दावे पोकळ आहेत हे जगाला दिसले. होर्मुज सामुद्रधुनी आपल्या ताब्यात ठेवून इराणने जगासमोर मोठे तेलसंकट निर्माण करीत ट्रम्प यांना तोडीसतोड जबाब दिला. होर्मुझ खुले करण्यासाठी ट्रम्प यांनी इराणला वारंवार धमक्या दिल्या.परंतु इराण या धमक्यांनी बधला नाही. निर्वाणीचा इशारा म्हणून ट्रम्प यांनी शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या 21 युद्धनौकांनी इराणला घेरण्याचा प्रयत्न केला. इराणमध्ये सैनिक उतरवून जमिनीवरील युद्ध छेडण्याची धमकी दिली.
त्याला इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्डने (आयआरजीसी) जशास तसे उत्तर दिले.तुम्ही आमच्या देशात या आम्ही तुमची वाट पहात आहोत, असा जबरदस्त पलटवार आयआरजीसीने केला. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत झुकणार नाही, हे पाहताच ट्रम्प यांचे अवसान गळाले आहे. युद्धावर आधीच अब्जावधी डॉलर खर्च झाले आहेत. त्यावरून अमेरिकेतील विरोधी पक्ष डेमॉक्रेटीक पार्टी ट्रम्प यांच्यावर सातत्याने टीका करत आहे. अमेरिकन जनता ट्रम्प यांच्या युद्धखोरीच्या विरोधात रस्त्यावर उतरत आहे. युद्धामुळे महागाई वाढली. यामुळे ट्रम्प आता युद्धबंदी जाहीर करण्यासाठी सन्मानकारक मार्ग शोधत आहेत. होर्मुज ताब्यात घेणे याला आम्ही प्राधान्य देत नाही. आम्ही आधीपासून सांगत आहोत की हे युद्ध चार ते सहा आठवड्यात संपेल अशी भाषा स्वतः ट्रम्प, माध्यम सचिव लेव्हिट आणि अमेरिकेच्या अन्य काही नेत्यांनी गेले काही दिवस सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर उद्या ट्रम्प नेमकी काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. ट्रम्प हे इराण युद्ध संपले म्हणून जाहीर करतात की अमेरिकी सैनिकांना माघारी बोलावतात, होर्मुजमध्ये आम्हाला रस नाही म्हणतात की थेट क्युबावर हल्ल्याची गोष्ट करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.











