Ashok Kharat Case Nashik : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर परिसरातील स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु अशोक खरात याच्या अघोरी कृत्यांनी आणि अवाढव्य आर्थिक घोटाळ्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. शेकडो महिलांचे लैंगिक शोषण, बनावट कागदपत्रांच्या आधारे बँकिंग व्यवहार आणि सरकारी यंत्रणेला हजारो कोटींचा गंडा घालणारा हा भोंदू सध्या पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. गुरुवारी झालेल्या न्यायालयीन सुनावणीत खरातला ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, तपासादरम्यान नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे.
लैंगिक शोषण आणि अघोरी कृत्ये-
अशोक खरात याने अध्यात्माच्या नावाखाली अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढले होते. एका पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, खरात तिला “तू पूर्वजन्मीची अप्सरा आहेस” असे सांगून तिची दिशाभूल करत असे. लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्यावर वारंवार अत्याचार केले, ज्यातून ती गर्भवती राहिली. धक्कादायक बाब म्हणजे, खरातने तिला काही अज्ञात गोळ्या आणि जडीबुटी देऊन तिचा जबरदस्तीने गर्भपात घडवून आणला. या कृत्यात त्याला साथ देणारे डॉक्टर आणि औषध विक्रेते (फार्मासिस्ट) आता विशेष तपास पथकाच्या (SIT) रडारवर आहेत.
आर्थिक गैरव्यवहार आणि राजकीय कनेक्शन-
केवळ लैंगिक शोषणच नव्हे, तर खरातने आर्थिक क्षेत्रातही मोठी माया जमवली आहे. जगदंब आणि समता या दोन पतसंस्थांच्या माध्यमातून त्याने शेकडो बेनामी खाती उघडली होती. या खात्यांचा वारसदार म्हणून स्वतः खरातचे नाव होते आणि सर्व खाती त्याच्याच मोबाईल क्रमांकाशी लिंक होती. या प्रकरणाचे गांभीर्य वाढवणारी बाब म्हणजे, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नेत्या रुपाली चाकणकर यांच्या बहिणीच्या नावावर असलेल्या खात्याचाही समावेश आहे. या खात्यांच्या माध्यमातून १०० कोटींहून अधिक रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
नाफेड कांदा घोटाळा: १३०० कोटींचा महाघोटाळा?
अशोक खरातचा संबंध केवळ भोंदूगिरीशी नसून, त्याने सरकारी तिजोरीवरही डल्ला मारल्याचा आरोप आहे. ‘श्री व्यंकटेश फार्मर प्रोड्युसर कंपनी’ या नावाखाली त्याने मार्च २०२४ मध्ये संशयास्पदरित्या नाफेडची (NAFED) मान्यता मिळवली. सातबारा उताऱ्यावर बनावट नोंदी करून, जिथे प्रत्यक्षात द्राक्षबागा होत्या तिथे कांदा पीक दाखवून त्याने नाफेड आणि एनसीसीएफ (NCCF) अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुमारे १३०० ते १४०० कोटी रुपयांचा कांदा घोटाळा केल्याचा संशय आहे. या महाघोटाळ्याची पाळेमुळे शोधण्यासाठी आता सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.
न्यायालयीन सुनावणी आणि पोलीस कोठडी-
सुरक्षेच्या कारणास्तव अशोक खरातला प्रत्यक्ष न्यायालयात हजर न करता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सादर करण्यात आले होते. सुनावणी दरम्यान सरकारी वकील ॲड. शैलेंद्र बागडे यांनी खरात हा ‘मास्टरमाईंड’ असून तो तपासात सहकार्य करत नसल्याचे न्यायालयाला सांगितले. “खरात हा अत्यंत सराईत असून त्याने पीडितेच्या नातेवाईकांचे आधार आणि पॅन कार्ड हस्तगत करून त्यांचा गैरवापर केला आहे,” असा युक्तीवाद सरकारी पक्षाने केला. न्या. बी. एन. ईचपुरानी यांनी दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर खरातची ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.












