Home / Uncategorized / NASA’s Artemis-2 : नासाचे आर्टेमिस-2 चंद्राकडे झेपावले ! पाच दशकांनंतरची ऐतिहासिक मोहीम

NASA’s Artemis-2 : नासाचे आर्टेमिस-2 चंद्राकडे झेपावले ! पाच दशकांनंतरची ऐतिहासिक मोहीम

NASA’s Artemis-2 : अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाच्या ऐतिहासिक आर्टेमिस-2 मोहिमेअंतर्गत चार अंतराळवीरांना घेऊन ओरियन रॉकेट फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटरवरून...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

NASA’s Artemis-2 : अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाच्या ऐतिहासिक आर्टेमिस-2 मोहिमेअंतर्गत चार अंतराळवीरांना घेऊन ओरियन रॉकेट फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटरवरून  भारतीय वेळेनुसार आज पहाटे 3 वाजून 54 मिनिटांनी चंद्राच्या दिशेने झेपावले. 1972 च्या अपोलो 17 मोहिमेनंतर आर्टेमिस-2 मोहीमेच्या माध्यमातून सुमारे 53 वर्षांनंतर अंतराळवीर पहिल्यांदाच पृथ्वीच्या कक्षेबाहेर  चंद्राभोवती प्रवास करून परत येणार आहे. त्यामुळेच ही मोहीम ऐतिहासिक ठरली आहे.


या मोहिमेसाठी नासाने स्पेस लाँच सिस्टीम (एसएलएस) या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.एसएलएस रॉकेटचे केनेडी स्पेस सेंटरमधून प्रक्षेपण होताना रॉकेटचा आवाज काही किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू आला.यावेळी हजारो लोक आणि नासाचे कर्मचारी हे प्रक्षेपण प्रत्यक्ष पाहण्यासाठी उपस्थित होते. प्रक्षेपण यशस्वी होताच सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात मोहिमेला सदिच्छा दिल्या.
1960 आणि 1970 च्या दशकात नासाने सहा अपोलो  मोहिमांद्वारे 12 अंतराळवीरांना चंद्रावर उतरवले होते. त्यानंतरच्या काळात आजवर शेकडो अंतराळवीरांनी अंतराळ प्रवास केला. मात्र त्यांच्यापैकी कोणीही आंतरराष्ट्रीय अवकाश तळाच्या पुढे गेले नव्हते. हा अवकाश तळ पृथ्वीपासून सुमारे 400 किलोमीटर अंतरावर पृथ्वीच्या निम्न कक्षेत (लोअर अर्थ ऑर्बिट) स्थापित आहे.

पहिल्या चांद्रमोहिमेला अपोलो हे नाव ग्रीक देवावरून देण्यात आले होते.या ग्रीक देवाच्या जुळ्या बहिणीचे नाव आर्टेमिस (चंद्र) होते. त्यावरून या मोहिमेला आर्टेमिस हे नाव देण्यात आले आहे. ग्रीक पुराणकथेत या जुळ्या बहिणीचा उल्लेख आहे. या मोहिमेमध्ये चार अंतराळवीर सहभागी आहेत. रिड वाईजमन, व्हिक्टर ग्रोव्हर, क्रिस्टिनमा कोच आणि जेरेमी हॅन्सन अशी त्यांची नावे आहेत.क्रिस्टीना या एकमेव महिला अंतराळवीर या मोहिमेत सहभागी आहेत. चंद्राच्या जवळ पोहोचणार्‍या त्या पहिल्या महिला अंतराळवीर ठरतील. वाईजमन हे मोहिमेचे कमांडर आहेत. तर ग्रोव्हर हे वैमानिक आहेत. ते चांद्र मोहिमेवर जाणारे आफ्रिकन-अमेरिकन अंतराळवीर आहेत.
 चंद्रावर पुन्हा पाऊल ठेवण्यासाठी आणि तिथे जास्त काळ वास्तव्य करण्याच्या उद्देशाने चाचपणी करण्यासाठी आर्टेमिस मोहीम नासाने हाती घेतली आहे. याआधी 2022 मध्ये नासाने मानव विरहित आर्टेमिस चाचणी मोहीम यशस्वी केली होती.

आताची आर्टेमिस -2 हे त्या मोहिमेचे पुढचे पाऊल आहे. या मोहिमेत अंतराळवीर चंद्रावर उतरणार नाहीत. ते चंद्राच्या सुमारे 7 हजार 400 किलोमीटर जवळ जाऊन त्याच्या भोवती प्रदक्षिणा घालून तेथील वातावरणात अनेक महत्त्वपूर्ण वैज्ञानिक प्रयोग करणार आहेत. अंतराळात जास्त काळ वास्तव्य करण्याची चाचपणी, खोल अंतराळातील दिशादर्शन आणि दळणवळण प्रणालीची चाचणी, चंद्राभोवती मानवाला सुरक्षितपणे फिरवण्याच्या ओरियन मॉड्युलच्या क्षमतेची पडताळणी करणे, अंतराळयानाचे संचालन, भविष्यातील डॉकिंग-अनडॉकिंग (अंतराळात दोन याने एकमेकांना जोडणे आणि विलग होणे) प्रक्रियेचा सराव करणे आणि भविष्यातील मोहिमांसाठी उपयुक्त अशी माहिती गोळा करणे ही या मोहिमेची उद्दिष्ट्ये आहेत.


आर्टेमिस-2 यान चंद्राचा पृथ्वीवरून जो भाग दिसतो त्याच्या मागच्या भागात पोहोचेल तेव्हा ते पृथ्वीपासून 4 लाख किलोमीटर दूर असेल. म्हणजेच अपोलो मोहिमांपेक्षाही अधिक अंतरावर हे यान पोहोचणार आहे.आपले काम पूर्ण केल्यानंतर दहा दिवसांनी आर्टेमिस-2 यान अंतराळवीरांना घेऊन पृथ्वीवर परतेल. प्रशांत महासागरात हे यान उतरवले जाईल.

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या