US Army Chief Randy George fired by Pete Hegseth : अमेरिकेने इराणविरुद्ध पुकारलेल्या युद्धाच्या धामधुमीतच अमेरिकन लष्कराच्या वरिष्ठ पातळीवर मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी लष्करप्रमुख (Army Chief of Staff) जनरल रँडी जॉर्ज यांना तातडीने निवृत्त होऊन पद सोडण्यास सांगितले आहे. पेंटागॉनने या वृत्ताला दुजोरा दिला असून, यामुळे अमेरिकन संरक्षण दलात मोठी खळबळ उडाली आहे.
पेंटागॉनमध्ये बदलांचे वारे
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्रीय सुरक्षा अजेंडा राबवण्यासाठी हेगसेथ यांनी पदभार स्वीकारल्यापासून अनेक वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना पदावरून हटवले आहे. जनरल रँडी जॉर्ज यांची हकालपट्टी ही याच मोहिमेचा एक भाग मानली जात आहे.
हेगसेथ यांनी आतापर्यंत डझनहून अधिक जनरल आणि ॲडमिरल्सना घरचा रस्ता दाखवला आहे. यापूर्वी नौदल प्रमुख ॲडमिरल लिसा फ्रँचेटी आणि हवाई दलाचे जनरल जिम सिल्फे यांनाही अशाच प्रकारे पदावरून दूर करण्यात आले होते.
इतर वरिष्ठ अधिकारीही रडारवर?
केवळ लष्करप्रमुखच नाही, तर ट्रम्प प्रशासनातील इतरही काही बड्या नावांच्या गच्छंतीची चर्चा सुरू आहे. यामध्ये एफबीआय संचालक काश पटेल, लष्करी सचिव डॅनियल ड्रिस्कॉल आणि कामगार सचिव लोरी चावेझ-डेरेमर यांचा समावेश असल्याचे समजते. मात्र, या बदलांबाबत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही.
कोण आहेत जनरल रँडी जॉर्ज?
जनरल रँडी जॉर्ज हे एक अनुभवी पायदळ अधिकारी आहेत. वेस्ट पॉईंट मिलिटरी अकॅडमीचे पदवीधर असलेल्या जॉर्ज यांनी पहिल्या आखाती युद्धासह इराक आणि अफगाणिस्तानमधील युद्धांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. 2023 मध्ये त्यांची लष्करप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. साधारणपणे या पदाचा कार्यकाळ 4 वर्षांचा असतो, मात्र त्याआधीच त्यांना पद सोडण्यास सांगण्यात आले आहे. बायडेन प्रशासनाच्या काळात त्यांनी तत्कालीन संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांचे वरिष्ठ लष्करी सल्लागार म्हणूनही काम पाहिले होते.
युद्धाच्या काळात बदलांचे परिणाम
इराणसोबत युद्ध सुरू असताना लष्कराच्या सर्वोच्च नेतृत्वात बदल करणे हे अत्यंत धाडसी आणि तितकेच जोखमीचे पाऊल मानले जात आहे. जनरल रँडी जॉर्ज यांच्या जागी आता कोणाची वर्णी लागते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. जनरल जेम्स मिंगस यांच्या जागी आधीच लेफ्टनंट जनरल क्रिस्टोफर ला नेव्ह यांची नियुक्ती करण्यात आली असून, ते हेगसेथ यांचे विश्वासू मानले जातात.









