Yuvraj Singh apology to MS Dhoni and Kapil Dev : भारताचा दिग्गज माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याने अखेर आपल्या वडिलांच्या विधानांमुळे निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. युवराजचे वडील योगराज सिंग यांनी गेल्या अनेक वर्षांपासून भारताचे दोन महान कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि कपिल देव यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल युवराजने देशाची माफी मागितली आहे. ने प्रसिद्ध केलेल्या एका टीझर व्हिडिओमध्ये युवराजने आपले मत मांडले आहे.
वडिलांच्या विधानांवर युवीची नाराजी
‘स्पोर्ट्स तक’ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना युवराजने याविषयी भाष्य केले आहे. योगराज सिंग यांनी अनेकदा जाहीरपणे धोनीवर आरोप केले होते की, धोनीमुळेच युवराजला भारतीय संघातून डच्चू मिळाला. याशिवाय गेल्या वर्षी त्यांनी कपिल देव यांच्यावरही गंभीर आरोप करत जुन्या आठवणींना उजाळा दिला होता.
यावर भाष्य करताना युवराज म्हणाला, “मला कपिल देव आणि एमएस धोनी यांची माफी मागायची आहे. मी वडिलांना स्पष्टपणे सांगितले आहे की, अशी विधाने करणे योग्य नाही.” वडिलांच्या स्वभावामुळे आणि त्यांच्या विधानांमुळे आपल्याला नेहमीच अस्वस्थ वाटत असल्याचे युवराजने यावेळी मान्य केले.
धोनी आणि युवराजमधील खरे नाते
योगराज सिंग यांनी जरी धोनीवर टीका केली असली, तरी युवराजने नेहमीच धोनीचा आदर केला आहे. युवराजने यापूर्वीच सांगितले होते की, 2017 मध्ये जेव्हा त्याने संघात पुनरागमन केले, तेव्हा धोनीनेच त्याला त्याच्या भविष्यातील भूमिकेबद्दल स्पष्ट कल्पना दिली होती. संघ व्यवस्थापन आता भविष्यासाठी नवीन खेळाडूंचा विचार करत असल्याचे धोनीने त्याला प्रामाणिकपणे सांगितले होते. याच स्पष्टतेमुळे युवराजला 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेणे सोपे झाले होते.
निवड समितीचा खुलासा
काही काळापूर्वी माजी मुख्य निवडकर्ते संदीप पाटील यांनीही स्पष्ट केले होते की, युवराजला संघातून बाहेर काढण्याचा निर्णय केवळ निवड समितीचा होता, त्यामध्ये धोनीचा कोणताही दबाव नव्हता. वाढते वय आणि कामगिरीतील घसरण यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. या खुलाशानंतर योगराज सिंग यांच्या सुरातही बदल झाला असून, त्यांनी अलीकडेच धोनीचे कौतुक करत त्याने खेळत राहावे अशी इच्छा व्यक्त केली होती.










