Artemis II mission astronauts location and moon arrival : नासाची ऐतिहासिक ‘आर्टेमिस 2’ मोहीम १ एप्रिल २०२६ रोजी यशस्वीरित्या लाँच झाली आहे. या मोहिमेबद्दल सध्या जगभरात प्रचंड कुतूहल असून, अंतराळवीरांचा प्रवास नेमका कसा सुरू आहे, याबद्दल अनेक प्रश्न विचारले जात आहेत. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे खालीलप्रमाणे आहेत:
१. ‘आर्टेमिस 2’ चे अंतराळवीर सध्या कुठे आहेत?
प्रक्षेपणांनंतर पहिल्या दिवशी ओरियन कॅप्सूलने पृथ्वीच्या उच्च कक्षेमध्ये यशस्वीरित्या प्रवेश केला. सध्या हे चार अंतराळवीर पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असून, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापेक्षा (ISS) सुमारे १८४ पट अधिक उंचीवर आहेत. येथून ते यानातील सर्व तांत्रिक यंत्रणांची तपासणी करत आहेत.
२. मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी काय बदल होणार?
गुरुवार, २ एप्रिल रोजी अंतराळवीरांनी ओरियन यानाला पृथ्वीपासूनच्या सर्वात जवळच्या बिंदूवरून (पेरिगी) वर उचलण्याची महत्त्वाची प्रक्रिया सुरू केली. याला ‘ट्रान्सलुनर इंजेक्शन बर्न’ असे म्हणतात. यामुळे हे यान पृथ्वीची कक्षा सोडून आता चंद्राच्या दिशेने चार दिवसांच्या प्रवासाला निघाले आहे.
३. हे यान चंद्राच्या जवळ कधी पोहोचणार?
१ एप्रिल रोजी झेपावलेले हे यान साधारण ५ ते ६ दिवसांनंतर म्हणजे ६ एप्रिल २०२६ रोजी चंद्राच्या प्रभाव क्षेत्रात प्रवेश करेल. या दिवशी हे यान चंद्राच्या दुसऱ्या बाजूने प्रदक्षिणा घालेल.
४. या मोहिमेत कोणते विक्रम प्रस्थापित होणार?
६ एप्रिल रोजी जेव्हा हे अंतराळवीर चंद्राच्या मागच्या बाजूने वळसा घालतील, तेव्हा ते अपोलो १३ मोहिमेने प्रस्थापित केलेला अंतराळातील सर्वाधिक अंतराचा विक्रम मोडीत काढतील. या मोहिमेत व्हिक्टर ग्लोव्हर हे चंद्राजवळ जाणारे पहिले कृष्णवर्णीय, क्रिस्टीना कोच या पहिल्या महिला आणि जेरेमी हॅन्सन हे पहिले कॅनेडियन नागरिक ठरतील.
५. अंतराळवीर पृथ्वीवर कधी परतणार?
मोहिमेच्या १० व्या दिवशी ओरियन कॅप्सूल पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करेल. पॅराशूटच्या साहाय्याने हे अंतराळवीर पॅसिफिक महासागरात उतरतील, जिथे नासा आणि अमेरिकन नौदलाची टीम त्यांना बाहेर काढण्यासाठी सज्ज असेल.










