USA Iran War: पश्चिम आशियातील तणाव आता टोकाला पोहोचला असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला मोठा दणका दिल्याचे जाहीर केले आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या प्लॅटफॉर्मवर एका पोस्टद्वारे दावा केला की, अमेरिकेने इराणची राजधानी तेहरानवर एक मोठा हल्ला केला आहे. या कारवाईत इराणच्या लष्करी नेतृत्वातील अनेक बड्या अधिकाऱ्यांचा खात्मा करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
48 तासांचा अल्टिमेटम आणि भीषण इशारा
हा हल्ला करण्यापूर्वी ट्रम्प यांनी इराणला 48 तासांचा शेवटचा अल्टिमेटम दिला होता. इराणने एकतर वॉशिंग्टनसोबत करार करावा किंवा जागतिक तेल पुरवठ्यासाठी महत्त्वाचा असलेला ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ हा जलमार्ग खुला करावा, असा इशारा त्यांनी दिला होता. जर इराणने हे मान्य केले नाही, तर त्यांच्यावर ‘नरकाचा वर्षाव’ होईल, अशी थेट धमकी ट्रम्प यांनी दिली होती.
अमेरिकन विमाने पाडली, वैमानिक बेपत्ता
या युद्धाच्या सहा आठवड्यांच्या काळात पहिल्यांदाच अमेरिकेला मोठे नुकसान सोसावे लागले आहे. इराणने एकाच दिवसात अमेरिकेची 2 लढाऊ विमाने पाडल्याचे वृत्त आहे. यातील एक अमेरिकन वैमानिक अद्याप इराणच्या हद्दीत बेपत्ता असून, त्याला शोधण्यासाठी अमेरिकन लष्कराने हाय-रिस्क रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले आहे. या घटनेनंतर अमेरिकन प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
वॉशिंग्टनमध्ये राजकीय उलथापालथ
युद्धाच्या मैदानावरील या धक्क्यांमुळे अमेरिकेच्या संरक्षण विभागातही मोठे बदल पाहायला मिळत आहेत. संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी लष्करप्रमुख जनरल रँडी जॉर्ज यांना तात्काळ निवृत्त होण्यास सांगितले आहे. युद्धाच्या वाढत्या खर्चामुळे आणि धोरणात्मक अपयशामुळे ट्रम्प प्रशासनावर टीकेची झोड उठत असतानाच हे पाऊल उचलण्यात आले आहे.
इराणनेही या परिस्थितीवर सोशल मीडियावरून अमेरिकेची खिल्ली उडवली आहे. दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानमधील इराणच्या दूतावासांनी ट्रम्प यांच्या ‘रिजीम चेंज’च्या घोषणांचा निषेध करत, खरी राजकीय उलथापालथ अमेरिकेतच सुरू असल्याची टीका केली आहे.









