PM Kisan 23rd installment and Farmer ID card : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 23 व्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या महिन्यातच 22 वा हप्ता जमा झाल्यानंतर आता पुढच्या हप्त्यासाठी सरकारने नियमावलीत मोठे बदल केले आहेत. जर तुम्हाला 2000 रुपयांचा लाभ मिळवायचा असेल, तर आता तुमच्याकडे ‘डिजिटल किसान आयडी’ असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
काय आहे ही नवीन ‘फार्मर रजिस्ट्री’?
केंद्र सरकारने पारदर्शकता आणण्यासाठी आणि खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी ‘फार्मर रजिस्ट्री’ मोहीम सुरू केली आहे. यामध्ये शेतकऱ्यांची डिजिटल ओळख निर्माण केली जाते, ज्यामध्ये जमीन, पिके, खते आणि पशुपालनाशी संबंधित सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध असेल. विशेषतः नवीन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही आयडी बनवणे आता अनिवार्य झाले आहे.
या 14 राज्यांमध्ये नियम लागू
देशातील प्रमुख 14 राज्यांमध्ये किसान आयडी बनवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, बिहार, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, आसाम, छत्तीसगड आणि ओडिशा या राज्यांचा समावेश आहे. या राज्यांतील शेतकऱ्यांनी नोंदणी न केल्यास त्यांचा जून-जुलाई 2026 मध्ये येणारा हप्ता अडकू शकतो.
कधी येणार 23 वा हप्ता?
पीएम किसान योजनेचे हप्ते साधारणपणे दर 4 महिन्यांच्या अंतराने दिले जातात. 21 वा हप्ता नोव्हेंबर 2025 मध्ये आणि 22 वा हप्ता मार्च 2026 मध्ये वितरित करण्यात आला होता. यानुसार, 23 वा हप्ता जून किंवा जुलै 2026 च्या सुमारास शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
किसान आयडी (Farmer ID) कसा बनवाल?
- आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर आणि जमिनीचा सातबारा किंवा खसरा उतारा.
- प्रक्रिया: राज्याच्या अधिकृत कृषी पोर्टलवर किंवा ‘अॅग्री स्टॅक’ प्लॅटफॉर्मवर ऑनलाइन नोंदणी करून ई-केवायसी पूर्ण करावी लागेल.
मदतीसाठी संपर्क: जर तुम्हाला तांत्रिक अडचणी येत असतील, तर सरकारच्या हेल्पलाइन नंबर 155261 किंवा 1800115526 वर संपर्क साधू शकता. तसेच pmkisan-ict@gov.in या ईमेलवर आपली तक्रार नोंदवता येईल.
हे देखील वाचा –










