CSK vs RCB : इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ च्या हंगामात प्रेक्षकांना एका अत्यंत अटीतटीच्या आणि रोमांचक लढतीचा थरार अनुभवायला मिळाला. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) या दोन बलाढ्य संघांमधील या सामन्यात आरसीबीने चेन्नईवर ४३ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह बेंगळुरूच्या संघाने स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवत गुणतालिकेत (Points Table) प्रथम क्रमांकाचे स्थान काबीज केले आहे. चेन्नईच्या गोलंदाजांना निष्प्रभ ठरवत आरसीबीच्या फलंदाजांनी मैदानात धावांचा पाऊस पाडला.
या सामन्याचा खरा नायक ठरला तो म्हणजे आरसीबीचा स्फोटक फलंदाज टिम डेव्हिड. त्याने केवळ २५ चेंडूंमध्ये ७० धावांची तुफानी खेळी करत चेन्नईच्या विजयाच्या आशा धुळीस मिळवल्या. मात्र, चेन्नईसाठी या सामन्यातील सर्वात मोठी चूक टिम डेव्हिडला मिळालेले ‘जीवनदान’ ठरली. डेव्हिड अवघ्या २८ धावांवर असताना बाद झाला होता, परंतु तो चेंडू ‘नो बॉल’ (No Ball) ठरल्यामुळे त्याला जीवदान मिळाले. या सुवर्णसंधीचा फायदा घेत त्याने त्यानंतर मैदानावर चौफेर फटकेबाजी करत षटकारांची आतषबाजी केली. त्याच्या या झंझावाती फलंदाजीमुळे आरसीबीला एक विशाल धावसंख्या उभारता आली.
सामना संपल्यानंतर आपल्या या देदीप्यमान कामगिरीचे श्रेय टिम डेव्हिडने अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक याला दिले. आपल्या भावना व्यक्त करताना डेव्हिड म्हणाला की, “दिनेश कार्तिकसारख्या दिग्गज खेळाडूच्या मार्गदर्शनाखाली सराव करायला मिळणे, हे मी माझे मोठे भाग्य समजतो. असे तो म्हणाला.
“दिनेश कार्तिकसोबत सराव करणे हे माझे भाग्य”; विजयानंतर टिम डेव्हिडने उलगडले आपल्या यशाचे रहस्य-
चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात आपल्या वादळी फलंदाजीने आरसीबीला विजय मिळवून दिल्यानंतर, टिम डेव्हिडने आपल्या भावना अतिशय प्रांजळपणे व्यक्त केल्या आहेत. सामन्यानंतर बोलताना तो म्हणाला की, अशा प्रकारची खेळी दररोज साकारता येत नाही, त्यामुळे या यशाचा आनंद विशेष आहे. त्याने आपल्या यशाचे श्रेय संघातील खेळाडू आणि पोषक वातावरणाला दिले आहे. विशेषतः कर्णधार रजत पाटीदार सध्या अतिशय उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून, त्याच्या भक्कम सुरुवातीमुळे विरोधी संघावर दबाव निर्माण करणे आणि संघाला एका मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवणे अधिक सोपे आणि आनंददायी होते, असे मत डेव्हिडने व्यक्त केले.
टिम डेव्हिडने आपल्या फलंदाजीच्या शैलीबद्दल बोलताना सांगितले की, संघात त्याला वेगवेगळ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळते, हे तो आपले सुदैव समजतो. फलंदाजीचा क्रमांक बदलला तरी त्याच्या मूळ खेळात तो फारसा बदल करत नाही. “मी माझ्या नैसर्गिक पद्धतीने आणि पूर्ण आत्मविश्वासाने खेळण्यावर भर देतो. यामध्ये मला संघसहकारी आणि सपोर्ट स्टाफचा खंबीर पाठिंबा मिळतो,” असे त्याने नमूद केले. तसेच, आपल्या नंतर फलंदाजीला येणारे जितेश शर्मा आणि रोमारियो शेफर्ड यांच्यासारखे तडाखेबंद फलंदाज संघात असल्याने, मैदानात फटकेबाजी करताना आपला आत्मविश्वास अधिक वृद्धिंगत होतो, अशी कबुलीही त्याने दिली.
या संवादात त्याने अनुभवी खेळाडू दिनेश कार्तिक याचा विशेष गौरव केला. डेव्हिड म्हणाला की, “दिनेश कार्तिक हा अशा कठीण परिस्थिती हाताळण्यातील अत्यंत अनुभवी खेळाडू आहे. त्यांच्यासोबत सराव करायला मिळणे आणि त्यांच्या अनुभवातून शिकणे हे मी माझे भाग्य समजतो.”
धावता आढावा: आरसीबीच्या फलंदाजांचा रणसंग्राम; चेन्नईचा डाव २०७ धावांत खुडला, बेंगळुरूचा शानदार विजय-
आयपीएल २०२६ च्या या हाय-व्होल्टेज सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि निर्धारित २० षटकांत अवघ्या ३ गड्यांच्या मोबदल्यात २५० धावांचा हिमालयीन डोंगर उभा केला. आरसीबीच्या फलंदाजांनी सुरुवातीपासूनच चेन्नईच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. सलामीवीर देवदत्त पडिक्कल याने ५० धावांची अर्धशतकी खेळी करून संघाला भक्कम पाया रचून दिला. त्यानंतर मैदानात आलेल्या टिम डेव्हिडने आपल्या बॅटमधून धावांचा वणवा पेटवत नाबाद ७० धावांची स्फोटक खेळी साकारली. त्याला कर्णधार रजत पाटीदार याने मोलाची साथ देत नाबाद ४८ धावांचे योगदान दिले, ज्यामुळे आरसीबीला सव्वा दोनशे धावांचा टप्पा पार करता आला.
बेंगळुरूने दिलेल्या २५१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाची सुरुवात अडखळत झाली. आरसीबीच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर चेन्नईचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले. चेन्नईकडून सरफराज खान याने एकाकी झुंज देत सर्वाधिक ५० धावांची खेळी केली, तर प्रशांत वीर याने ४३ धावांचे योगदान देऊन डावाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाढत्या धावगतीचे दडपण आणि आरसीबीच्या अचूक माऱ्यामुळे चेन्नईचा संपूर्ण संघ १९.४ षटकांत २०७ धावांवर सर्वबाद (All Out) झाला. परिणामी, चेन्नईला ४३ धावांनी या पराभवाचा स्वीकार करावा लागला.










