Bhuvneshwar Kumar : बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेल्या हाय-व्होल्टेज सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने (RCB) आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्सचा पराभव करत विजयाचा अश्वमेध कायम राखला आहे. या संस्मरणीय विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो म्हणजे भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार. या सामन्यात त्याने केवळ आपल्या धारदार गोलंदाजीने चेन्नईचा डाव उधळून लावला नाही, तर आयपीएलच्या इतिहासात एक सुवर्ण अध्यायही लिहिला. भुवनेश्वर कुमारने आयपीएलमध्ये २०० बळींचा टप्पा पूर्ण करण्याचा महद्पराक्रम केला असून, अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा तो जगातील पहिला वेगवान गोलंदाज (Pacer) आणि एकूण दुसरा गोलंदाज ठरला आहे.
आपल्या या गौरवशाली कामगिरीनंतर भावना व्यक्त करताना भुवनेश्वर कुमार कमालीचा भावूक झाला होता. तो म्हणाला की, “गेल्या अनेक वर्षांपासून केलेल्या सातत्यपूर्ण कष्टांचे आणि परिश्रमांचे फळ जेव्हा अशा प्रकारे मिळते, तेव्हा मिळणारा आनंद हा शब्दांत व्यक्त करण्यापलीकडचा असतो. ही खेळपट्टी फलंदाजांसाठी काहीशी आव्हानात्मक होती, परंतु गोलंदाज म्हणून संयम राखणे महत्त्वाचे होते.” भुवीच्या या विक्रमाने त्याच्या प्रदीर्घ कारकिर्दीतील चिकाटी आणि कौशल्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून, आरसीबीच्या चाहत्यांनी स्टेडियममध्ये त्याचे उभे राहून अभिवादन केले.
सामन्यातील परिस्थितीवर भाष्य करताना भुवनेश्वरने एक मजेशीर आठवणही सांगितली. आरसीबीच्या डावात टिम डेव्हिडने केलेल्या चौफेर फटकेबाजीबद्दल बोलताना तो म्हणाला की, “टिम डेव्हिडची ती स्फोटक फलंदाजी पाहताना मी काहीसा संभ्रमात होतो. एक संघ सहकारी म्हणून त्याच्या बॅटिंगचा आनंद घ्यावा की प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या अवस्थेबद्दल दुःख व्यक्त करावे, हे मला समजत नव्हते. कारण त्याच्या या फलंदाजीनंतर आम्हाला लगेचच गोलंदाजीसाठी मैदानात उतरायचे होते असं म्हणत भुवीने आपली भावना व्यक्त केली.
“साधी रणनीती आणि अचूक टप्पा हाच यशाचा मंत्र”; क्रॅम्प्सवर मात करत भुवीने उलगडले विजयाचे समीकरण-
चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेल्या हाय-व्होल्टेज सामन्यात चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध आरसीबीला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या भुवनेश्वर कुमारने आपल्या यशाचे गमक स्पष्ट केले आहे. २०० बळींचा ऐतिहासिक टप्पा गाठल्यानंतर भुवनेश्वरने आपल्या गोलंदाजीच्या रणनीतीबद्दल सविस्तर भाष्य केले. सामन्यादरम्यान स्नायूंच्या ओढल्या जाण्यामुळे (Cramps) शारीरिक त्रास होत असतानाही, भुवीने मैदानात जिद्द सोडली नाही. तो म्हणाला की, “शारीरिक अडचणींमुळे मी माझी रणनीती अत्यंत साधी आणि सुटसुटीत ठेवली होती. चेंडूचा अचूक टप्पा राखणे आणि फलंदाजाला जखडून ठेवणे या एकाच गोष्टीवर मी लक्ष केंद्रित केले आणि सुदैवाने त्याचा मोठा फायदा मला मिळाला.”
बेंगळुरूचे चिन्नास्वामी स्टेडियम हे फलंदाजांसाठी नंदनवन आणि गोलंदाजांसाठी नेहमीच आव्हानात्मक मानले जाते. या मैदानाच्या लहान सीमा-(Boundaries) विचारात घेता, मोठ्या धावसंख्येचा बचाव करणे ही गोलंदाजांसाठी तारेवरची कसरत असते. यावर बोलताना भुवनेश्वर कुमारने नमूद केले की, “अशा मैदानावर धावा रोखणे कधीही सोपे नसते. मात्र, आमच्या संघाने सामन्यापूर्वी केलेल्या नियोजनाची (Team Meeting) काटेकोरपणे अंमलबजावणी केली. आम्ही जे काही ठरवले होते, ते मैदानात उतरवण्यात आम्हाला यश आले, हेच आमच्या विजयाचे मुख्य कारण आहे.”
भुवनेश्वर कुमारचा विक्रमी ‘द्विशतक’ टप्पा-
भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) २०२६ च्या हंगामात आपल्या कारकिर्दीतील एका सुवर्ण अध्यायाची नोंद केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील अटीतटीच्या सामन्यात भुवनेश्वरने चेंडूशी अशी काही जादू केली की, त्याने आयपीएलमधील आपल्या २०० बळींचा ऐतिहासिक टप्पा दिमाखात पूर्ण केला. ही ‘डबल सेंच्युरी’ साजरी करणारा तो आयपीएलच्या इतिहासातील पहिला भारतीय वेगवान गोलंदाज (Pacer) ठरला असून, त्याच्या या कामगिरीने क्रिकेट विश्वात त्याचे कौतुक होत आहे.
सामन्याच्या सुरुवातीलाच भुवनेश्वरने आपल्यातील कौशल्याची झलक दाखवली. आपल्या कोट्यातील पहिल्याच षटकात त्याने चेन्नईचा फलंदाज आयुष म्हात्रे याला अवघ्या एका धावेवर पायचित करत तंबूचा रस्ता दाखवला. आयुषची विकेट घेताच भुवनेश्वरने २०० विकेट्सचा आकडा गाठला.











