Anjali Damania : प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज घेतलेल्या एका विशेष पत्रकार परिषदेत तथाकथित भोंदू बाबा अशोक खरात आणि प्रस्थापित राजकीय नेत्यांच्या साट्यालोट्याबाबत धक्कादायक गौप्यस्फोट केले. “केवळ भोंदू बाबांवर गुन्हे दाखल करून हे सत्र थांबणार नाही, तर त्यांना अभय देणाऱ्या आणि त्यांच्याशी संबंध राखणाऱ्या राजकीय नेत्यांवर जोपर्यंत कठोर कायदेशीर कारवाई होत नाही, तोपर्यंत समाजातील असे अपप्रकार समूळ नष्ट होणार नाहीत,” असे ठाम प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. हे विधान करताना दमानिया अत्यंत भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
“उपमुख्यमंत्र्यांनी भोंदू बाबाला इतके फोन का केले?”-
राज्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या एका पत्रकार परिषदेत अंजली दमानिया यांनी अत्यंत आक्रमक आणि तितकाच संवेदनशील पवित्रा घेतला. तथाकथित भोंदू बाबा अशोक खरात याच्या ‘कॉल डिटेल रेकॉर्ड्स’चा (CDR) संदर्भ देत त्यांनी थेट सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.
“माझे डोळे झिजले”; पुराव्यांच्या शोधातील संघर्षाचा थरार
हे आरोप करत असताना अंजली दमानिया यांना आपल्या भावना अनावर झाल्या. पुराव्यांची जमवाजमव करण्यासाठी त्यांना किती शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला, हे सांगताना त्यांचा कंठ दाटून आला. त्या म्हणाल्या, “मी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले आहेत. त्या फोनमधील ‘टॉप ३०’ कॉल्सचा शोध घेताना आणि त्यांच्या नोंदी तपासताना माझे डोळे झिजले आहेत. ही माहिती केवळ राजकीय आरोपांसाठी नाही, तर समाजातील सत्य समोर आणण्यासाठी मी गोळा केली आहे.” लोकशाहीत प्रश्न विचारण्याचा अधिकार आम्हाला नाही का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
“राजकीय छत्र सोडून माझ्याशी लढून दाखवा!”; अंजली दमानियांचे टीकाकारांना खुले आव्हान-
भोंदूगिरी आणि राजकीय भ्रष्टाचाराच्या विरोधात सातत्याने आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आजच्या पत्रकार परिषदेत आपल्या विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. त्यांच्याकडे असलेल्या पुराव्यांवर आणि कार्यपद्धतीवर संशय व्यक्त करणाऱ्यांना उद्देशून त्यांनी अत्यंत जळजळीत शब्दांत टीका केली. “केवळ तोंड आहे म्हणून वाटेल ते बोलत सुटणे सोपे असते, परंतु सत्य शोधण्यासाठी लागणारी हिंमत वेगळी असते,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
राजकीय नेत्यांना दिले खुले आव्हान-
राजकीय पक्षांच्या आडोशाने आपल्यावर टीका करणाऱ्या नेत्यांना दमानिया यांनी थेट आव्हान दिले आहे. त्या म्हणाल्या, “ज्यांना माझ्या कामावर आक्षेप आहे, त्यांनी एकदा आपल्या पक्षाचे सुरक्षित कवच किंवा राजकीय ‘छत्र’ बाजूला सारून माझ्याशी दोन हात करून दाखवावेत. केवळ सत्तेच्या किंवा संघटनेच्या जोरावर टीका करण्यापेक्षा, एकटे येऊन लढावे, हे माझे तुम्हाला खुले आव्हान (Challange) आहे.” एखाद्या पक्षाचा पाठिंबा नसतानाही सत्यासाठी लढणे किती कठीण असते, याची जाणीव त्यांनी या विधानातून करून दिली.











