LPG Booking Scam Alert: इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाचा परिणाम आता भा
रतावरही दिसून येत आहे. या युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच भीतीचा फायदा घेऊन सायबर गुन्हेगार सक्रिय झाले असून, गॅस बुकिंगच्या नावाखाली लोकांची फसवणूक करत आहेत. या पार्श्वभूमीवर इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटरने (I4C) नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
कसा होतोय हा ‘एलपीजी’ स्कॅम?
सायबर गुन्हेगार सोशल मीडिया, व्हॉट्सॲप किंवा एसएमएसद्वारे मेसेज पाठवून गॅसचा तुटवडा असल्याचे भासवतात. “लवकर बुकिंग करा अन्यथा गॅस मिळणार नाही” किंवा “बुकिंगवर मोठी सूट मिळवा” असे आमिष दाखवले जाते. या मेसेजसोबत एक लिंक दिली जाते, जी हुबेहूब गॅस कंपनीच्या अधिकृत वेबसाइटसारखी दिसते. युजरने या लिंकवर क्लिक केल्यास किंवा क्यूआर कोड स्कॅन केल्यास, त्यांच्याकडून ओटीपी, पिन किंवा बँक तपशील मागवून खात्यातील पैसे लंपास केले जातात.
फसवणूक टाळण्यासाठी पोलिसांचा सल्ला
सायबर पोलिसांनी नागरिकांना खालील खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे:
- अनोळखी लिंक टाळा: व्हॉट्सॲप किंवा एसएमएसवर आलेल्या कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका किंवा कोणतीही एपीके फाईल इन्स्टॉल करू नका.
- अधिकृत प्लॅटफॉर्मचा वापर: गॅस बुकिंगसाठी नेहमी कंपन्यांच्या अधिकृत वेबसाइट्स (myLPG.in) किंवा अधिकृत अॅप्सचाच वापर करा.
- गोपनीय माहिती शेअर करू नका: कोणतीही गॅस एजन्सी तुमच्याकडे फोनवर ओटीपी, युपीआय पिन किंवा बँकेचा पासवर्ड मागत नाही. अशी माहिती कोणालाही देऊ नका.
- डिस्ट्रिब्युटरशी संपर्क साधा: शंका असल्यास तुमच्या अधिकृत गॅस वितरकाशी थेट फोनवर बोलून खात्री करा.
वेबसाइट खरी की खोटी कशी ओळखाल?
- वेबसाइटचा युआरएल तपासताना स्पेलिंगमध्ये काही चुका आहेत का ते पहा.
- सुरक्षित वेबसाइटच्या सुरुवातीला ‘HTTPS’ आणि लॉकचे चिन्ह असते.
- जर वेबसाइट तातडीने पेमेंट करण्यासाठी दबाव टाकत असेल, तर ती बनावट असू शकते.
फसवणूक झाल्यास काय करावे? जर तुमची फसवणूक झाली असेल, तर तातडीने तुमचे बँक खाते ब्लॉक करा आणि 1930 या हेल्पलाइन नंबरवर कॉल करा किंवा cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवा.











