David Warner Arrested: ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नर एका मोठ्या वादात अडकला आहे. सिडनीमधील मारौब्रा येथे मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याप्रकरणी (Drink Driving) पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. ३९ वर्षीय वॉर्नर सध्या सुरू असलेल्या पाकिस्तान सुपर लीग (PSL) २०२६ मध्ये कराची किंग्सचे नेतृत्व करत आहे, मात्र सामन्यांमध्ये काही दिवसांची विश्रांती असल्याने तो ऑस्ट्रेलियाला गेला होता.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सिडनी पोलिसांनी मारौब्रा परिसरात अचानक तपासणी मोहीम हाती घेतली होती. यावेळी वॉर्नरने आपली गाडी चाचणी केंद्रावर पोहोचण्यापूर्वीच थांबवून बाजूला पार्क केली. मात्र, संशय आल्याने पोलिसांनी त्याच्याकडे जाऊन त्याची श्वास तपासणी केली.
यावेळी तो नशेत असल्याचे आढळले. त्यानंतर त्याला मारौब्रा पोलीस ठाण्यात नेण्यात आले, जिथे त्याची चाचणी १०.४ (0.104) इतकी पॉझिटिव्ह आली. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून पुढील महिन्यात न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.
पीएसएल आणि बीबीएलमधील कारकीर्द
डेव्हिड वॉर्नरने २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली, तरी तो जगभरातील विविध फ्रँचायझी लीगमध्ये सक्रिय आहे.
- PSL 2026: वॉर्नरच्या नेतृत्वाखाली कराची किंग्सने सलग तीन विजय मिळवून गुणतालिकेत दुसरे स्थान गाठले आहे. ९ एप्रिल रोजी होणाऱ्या पेशावर झल्मीविरुद्धच्या सामन्यापूर्वी तो पाकिस्तानला परतणे अपेक्षित आहे.
- Big Bash League: नुकत्याच झालेल्या बीबीएल हंगामात सिडनी थंडरसाठी त्याने ४३३ धावा फटकावून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाचा मान मिळवला होता. त्याने पुढच्या हंगामासाठीही सिडनी थंडरसोबत करार केला आहे.
वॉर्नरची क्रिकेटमधील आकडेवारी
डेव्हिड वॉर्नरने ऑस्ट्रेलियासाठी ११२ कसोटी, १६१ एकदिवसीय आणि ११० टी-२० सामने खेळले असून सर्व फॉरमॅटमध्ये मिळून १५,००० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. २०१६ मध्ये त्याच्याच नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादने आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. आता या कायदेशीर कारवाईमुळे त्याच्या क्रिकेटमधील पुढील प्रवासावर काय परिणाम होतो, याकडे क्रीडा विश्वाचे लक्ष लागले आहे.










