Home / देश-विदेश / Hormuz closed again : युद्धबंदीचा फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर बॉम्बवर्षाव ! 254 निष्पाप नागरिकांचा बळी! इराणने होर्मुज पुन्हा बंद केली

Hormuz closed again : युद्धबंदीचा फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर बॉम्बवर्षाव ! 254 निष्पाप नागरिकांचा बळी! इराणने होर्मुज पुन्हा बंद केली

Hormuz closed again : पाकिस्तानच्या मध्यस्थीने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल स्वतःच घोषणा करून जाहीर केलेल्या दोन आठवड्यांच्या...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

 Hormuz closed again : पाकिस्तानच्या मध्यस्थीने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल स्वतःच घोषणा करून जाहीर केलेल्या दोन आठवड्यांच्या युद्धबंदीचा अवघ्या 24 तासांच्या आत फज्जा उडाला. ही तात्पुरती युद्धबंदी मान्य करून कालच इराणने होर्मुजची सामुद्रधुनी खुली केल्याने संपूर्ण जगाने सुटकेचा निःश्वास टाकला होता. मात्र हा दिलासा अगदीच अल्पजिवी ठरला. युद्धबंदीनंतर इस्रायलने लेबनॉनवर आणखी तीव्र बॉम्बहल्ले केले. राजधानी बैरूत आणि पूर्वेकडील अल हर्मेन शहरावर इस्रायलने अक्षरशः बॉम्बवर्षाव  केला. या हल्ल्यात लेबनॉनचे सुमारे 254 निरपराध नागरिक मारले गेले. त्यामुळे संतापलेल्या इराणने युद्धबंदी रद्द करून होर्मुजची पुन्हा नाकेबंदी केली. आमच्याशी जरादेखील आगळीक झाली तर आमचेही बोट ट्रिगरवर आहे हे विसरू नका, असा इशारा इराणचे राष्ट्राध्यक्ष पेजेश्कियान यांनी अमेरिका आणि इस्रायलला दिला.


काल युद्धबंदीची घोषणा करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी ही युद्धबंदी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या मध्यस्थीने झाली असे जाहीरपणे सांगत शरीफ यांचे कौतुक केले होते. तर ही तात्पुरती युद्धबंदी मान्य करताना इराणने अमेरिकेसमोर दहा कलमी प्रस्ताव ठेवला होता. या प्रस्तावात  युद्धबंदीनंतर लेबनॉनवर पुन्हा हल्ले होता कामा नयेत, हा एक प्रमुख मुद्दा होता. युद्धबंदी अंशतः मान्य करताना इस्रायलने मात्र कालच हा मुद्दा ट्रम्प यांच्याकडे लावून धरत युद्धबंदीमध्ये लेबनॉनचा समावेश करण्यास विरोध केला होता. मात्र युद्धबंदी करण्याची घाई झालेल्या ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची समजूत घालत इराणने दिलेल्या प्रस्तावावर विचार करण्याची ग्वाही दिली होती. इराणच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी उद्या 10 एप्रिलची तारीखही निश्चित करण्यात आली. पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये इराण आणि अमेरिकेच्या प्रतिनिधींची बैठकही आयोजित करण्यात आली.


मात्र या सर्व प्रक्रियेत अपेक्षेप्रमाणे नेतन्याहू यांनी खोडा घातला. लेबनॉनवर भीषण हल्ले करण्याबरोबरच नेतन्याहू यांनी इराणलाही डिवचले. इराणची ताकद आता संपुष्टात आली आहे.आम्ही आता अधिक ताकदीने लेबनॉनवर हल्ले करू, अशी चिथावणीखोर भाषा नेतन्याहू यांनी केली. याचा परिणाम होऊन इराणने आज तत्काळ होर्मुजची सामुद्रधुनी बंद केली. काही तासांमध्ये मिळालेल्या या कलाटणीमुळे होर्मुज परिसरात पुन्हा सन्नाटा पसरला. एकही जहाज आज होर्मुज पार करू शकले नाही.


इस्रायलने केलेले युद्धबंदीचे उल्लंघन आणि ट्रम्प यांनी भूमिका बदलल्याने इराणने ट्रम्प यांना जेरीस आणण्यासाठी आणि युद्धामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी आता नवीन डाव टाकला आहे. होर्मुजचा वापर केवळ शस्रासारखा न करता त्यातून आपली आर्थिक ताकद वाढवून डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्याची जबरदस्त खेळी इराणने सुरू केली आहे. इराणच्या तेल व्यापाराशी संबंधित हामिद हुसैनी यांनी होर्मुजमधून जाणार्‍या सर्व जहाजांकडून प्रति बॅरल 1 डॉलर टोल देण्याचे आदेश सर्व संबंधित देशांना दिले आहेत. महत्त्वाचे म्हणजे हा टोल कोणत्याही चलनात न देता बिटकॉईनच्या स्वरुपात स्वीकारले जाईल,असा रेडिओ संदेश हुसैनी यांनी संबंधित देशांना पाठवला आहे. लहान आकाराच्या जहाजांची क्षमता सुमारे साडेसात लाख बॅरल वाहून नेण्याची असते. याचा अर्थ प्रति जहाज इराण साडेसात लाख डॉलर एवढा अगडबंब टोल वसूल करणार आहे. बिटकॉईनमध्ये टोल देण्यास नकार दिल्यास जहाजाला जलसमाधी देण्याची धमकीही देण्यात आली आहे.


 युद्ध सुरू झाल्यापासून सतत भूमिका बदलत असलेल्या ट्रम्प यांनी आज पुन्हा आपली भूमिका बदलली. काल इराणचा दहा कलमी प्रस्ताव स्वीकारणार्‍या ट्रम्प यांनी आज घुमजाव केले. युद्धबंदीच्या करारामध्ये लेबनॉनचा समावेश नव्हता, अशी भूमिका आज ट्रम्प यांनी घेतली. ट्रम्प यांचे विश्वासू सहकारी आणि अमेरिकेचे उप राष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनीदेखील करारात लेबनॉनचा समावेश नव्हता, असे ठासून सांगितले. व्हाईट हाऊसच्या माध्यम विभागाच्या सचिव कॅरोलिना लेविट यांनी तर त्यापुढे जात इराणच्या दहा कलमी प्रस्तावाची खिल्ली उडवली. तो प्रस्ताव ट्रम्प यांनी कालच कचराकुंडीत टाकला होता, असे लेविट म्हणाल्या. एकूणच अमेरिका आणि इस्रायलच्या या आडमुठ्या भूमिकेमुळे युद्ध आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या