Home / महाराष्ट्र / Mira Bhayandar Fire : भाईंदर अग्निकांड: ५० झोपड्या खाक, तीन निष्पापांचा होरपळून मृत्यू; बेकायदेशीर गॅस सिलिंडरच्या साठ्यामुळे खळबळ

Mira Bhayandar Fire : भाईंदर अग्निकांड: ५० झोपड्या खाक, तीन निष्पापांचा होरपळून मृत्यू; बेकायदेशीर गॅस सिलिंडरच्या साठ्यामुळे खळबळ

Mira Bhayandar Fire : भाईंदर पूर्वेकडील इंद्रलोक फेज ४ परिसरातील एका आरक्षित भूखंडावर असलेल्या झोपडपट्टीला शुक्रवारी रात्री भीषण आग लागली....

By: Team Navakal
Mira Bhayandar Fire
Social + WhatsApp CTA

Mira Bhayandar Fire : भाईंदर पूर्वेकडील इंद्रलोक फेज ४ परिसरातील एका आरक्षित भूखंडावर असलेल्या झोपडपट्टीला शुक्रवारी रात्री भीषण आग लागली. प्रारंभी केवळ शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगीने पाहता पाहता रौद्र रूप धारण केले. या आगीमध्ये होरपळून तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ५० हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी शोककळा पसरली असून प्रशासकीय यंत्रणा हादरली आहे.

सिलिंडरचे स्फोट आणि जीवितहानी-
शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास लागलेली ही आग इतकी भयानक होती की, झोपडपट्टीतील गॅस सिलिंडरचे एकापाठोपाठ एक तीन भीषण स्फोट झाले. या स्फोटांच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरला आणि आगीच्या ज्वाळांनी काही क्षणातच अनेक घरांना कवेत घेतले. या दुर्घटनेत उत्तर प्रदेशचे रहिवासी असलेले गुड्डू राम (४६) यांच्यासह पश्चिम बंगालचे दोन अल्पवयीन तरुण, सुरज लियाकत अली मंडळ (१४) आणि रोहित रहेमत अली मंडळ (१५) यांचा होरपळून मृत्यू झाला. या तिघांचेही मृतदेह अग्निशमन दलाच्या शोधमोहिमेत आढळून आले आहेत.

अग्निशमन दलाची कामगिरी-
घटनेची माहिती मिळताच मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या ६ गाड्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. झोपडपट्टीचा परिसर दाट लोकवस्तीचा असल्याने आग विझवताना जवानांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. अखेर अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत ५० कुटुंबांचे संसार उघड्यावर आले होते.

बेकायदेशीर गॅस साठ्याचा गौप्यस्फोट-
आग विझवल्यानंतर जेव्हा अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी आणि तपास सुरू केला, तेव्हा एक धक्कादायक बाब समोर आली. या झोपडपट्टी परिसरात तब्बल २४ बेकायदेशीर गॅस सिलिंडरचा साठा आढळून आला. देशात सर्वत्र गॅसचा तुटवडा जाणवत असताना, इतक्या मोठ्या प्रमाणावर ज्वलनशील पदार्थांचा साठा एका अनधिकृत वस्तीत कोणी आणि कोणत्या हेतूने केला होता, यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. हा साठा या भीषण दुर्घटनेला कारणीभूत ठरला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अग्निशमन विभागाने सापडलेले २४ सिलिंडर जप्त केले असून या प्रकरणाचा तपास आता स्थानिक पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या