Beed Crime News : बीड जिल्ह्यामध्ये महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांचे सत्र थांबता थांबत नसल्याचे चित्र दिसत आहे. केज तालुक्यात नात्याला आणि माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका नराधम चुलत चुलत्याने आपल्याच अल्पवयीन पुतणीवर लैंगिक अत्याचार केले आणि त्यानंतर चुलतीने दिलेल्या धमकीला घाबरून या अभागी मुलीने विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
पाशवी अत्याचार आणि धक्कादायक धमकी-
मिळालेल्या माहितीनुसार, ५ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पीडित मुलगी घराच्या पाठीमागे असलेल्या गोठ्यातून घरी परतत होती. याच संधीचा फायदा घेत तिच्या वडिलांच्या चुलत भावाने तिला वाटेत अडवले आणि तिथेच तिच्यावर पाशवी अत्याचार केले. या भयावह प्रसंगामुळे मुलगी पूर्णपणे खचली होती. मात्र, ही बाब कोणालाही कळू नये म्हणून आरोपीच्या पत्नीने, म्हणजेच पीडितेच्या चुलतीने तिला गाठले. “हा प्रकार कोणाला सांगितलास, तर तुला जीवे मारून टाकेन,” अशी क्रूर धमकी तिला देण्यात आली.
उपचारादरम्यान मृत्यू-
चुलत्याचे दुष्कृत्य आणि चुलतीकडून मिळालेली धमकी यामुळे ही अल्पवयीन मुलगी प्रचंड मानसिक दडपणाखाली आली. संताप आणि भीतीपोटी तिने टोकाचे पाऊल उचलत विष प्राशन केले. प्रकृती चिंताजनक झाल्याने तिला तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. मात्र, मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि उपचारादरम्यान या निरागस मुलीचा अंत झाला.
आरोपीला पोलीस कोठडी-
या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने हालचाली करत मुख्य आरोपी चुलत्याला अटक केली आहे. त्याला केज न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्याला १५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात सहभाग असलेला दुसरा संशयित साथीदार सध्या फरार असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.











