Iran-America : पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये इराण आणि अमेरिका यांच्यात तब्बल 21 तास चाललेली युद्धविरामाची चर्चा दोन्ही देश आपापल्या मागण्यांवर ठाम राहिल्याने निष्फळ ठरली. त्यामुळे संतप्त झालेले अमेरिकेचे उप राष्ट्राध्यक्ष आणि अमेरिकेच्या प्रतिनिधी मंडळाचे नेते जे. डी. व्हान्स तत्काळ आपल्या सहकार्यांसह अमेरिकेला निघून गेले. इराणचे प्रतिनिधीही त्वरित मायदेशी परतले.
चर्चा निष्फळ ठरल्यानंतर दोन्ही देशांनी एकमेकांवर टीका केली. ट्रम्प यांनी तर चर्चा होवो किंवा न होवो होर्मुज खुले करणारच असा निर्धार व्यक्त केला. इराणची सागरी नाकेबंदी करण्याची धमकीही ट्रम्प यांनी दिली. त्यामुळे संपूर्ण जगावर असलेली युद्धाची छाया अधिकच गडद झाली आहे.
होर्मुजच्या सामुद्रधुनीवरील इराणचे नियंत्रण आणि इराणने आपला अणु कार्यक्रम सोडून द्यावा हे दोन प्रमुख मुद्दे या शांतता चर्चेमध्ये कळीचे मुद्दे ठरले. इराणने होर्मुजवरील टोलवसुली तत्काळ थांबवावी आणि आपल्या अण्वस्त्र संशोधनाचा कार्यक्रम रद्द करावा या अमेरिकेच्या दोन प्रमुख मागण्या आहेत. त्या मान्य करणे इराणला कदापि परवडणारे नाही. आपला अणू कार्यक्रम आम्ही सोडून देणार नाही आणि होर्मुज आमच्याच कब्जात राहील या भूमिकेवर इराण ठाम राहिला. दोन्ही देश या मुद्यावर माघार घेण्यास तयार न झाल्याने ही प्रदीर्घ काळ चाललेली चर्चा कोणत्याही ठोस निष्कर्षाशिवाय संपली.बैठकीदरम्यान इराणने कतार आणि अन्य आखाती देशांसह आपली परदेशांमधील जप्त केलेली मालमत्ता आपल्याला परत करावी, अशी मागणी केली. मात्र अमेरिकेच्या प्रतिनिधींनी ती फेटाळून लावली.
होर्मुज सामुद्रधुनी खुली करणे हा इराण आणि अमेरिका दोन्ही देशांसाठी प्रतिष्ठेचा मुद्दा बनला आहे. चर्चेदरम्यान होर्मुजमधून तेलाची वाहतूक टोलविरहित असावी, असा आग्रह अमेरिकेच्या प्रतिनिधींनींनी धरला. तर इराणने होर्मुजवर टोल वसुली करण्याचा आपला अधिकार अमेरिकेने मान्य करावा, अशी ठाम भूमिका घेतली.
लेबनॉनसह संपूर्ण पश्चिम आशिया क्षेत्रात शांतता प्रस्थापित करावी, ही इराणची आणखी एक महत्त्वाची मागणी आहे. चर्चेदरम्यान इराणच्या प्रतिनिधींनी ती मागणी केली. मात्र अमेरिकेच्या प्रतिनिधीनी अणु कार्यक्रम रद्द करणे आणि समुद्री सुरक्षेवर जोर दिला. त्यामुळे चर्चा पुढे सरकू शकली नाही. दोन्ही देशांना एकमेकांवर विश्वास नसणे, हेही चर्चा अपयशी ठरण्याचे एक कारण आहे. दोघांनीही एकमेकांवर आडमुठेपणाचा आरोप केला. त्यामुळे मतभेद दूर होण्याऐवजी वाद वाढला. दरम्यानच्या काळात चीन इराणला आपली अत्याधुनिक हवाई सुरक्षा प्रणाली गुप्तरित्या देणार असल्याचे वृत्त पसरले. त्यावर ट्रम्प यांनी थेट चीनला इशारा दिला. चीनने इराणला शस्त्रास्त्र पुरवठा करू नये, अन्यथा गंभीर परिणाम होतील, असा धमकीवजा इशारा ट्रम्प यांनी चीनला दिला. त्याचवेळी अमेरिका आपल्या तेल साठ्यातील 172 मिलियन बॅरल तेल विक्रीला काढेल ज्यामुळे तेल संकट वाढणार नाही, असे ट्रम्प यांनी जाहीर केले.
आता अमेरिकेकडून
होर्मुजची नाकाबंदी
इस्लामाबाद येथील इराण-अमेरिकेतील बोलणी फिस्कटल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरून अशी घोषणा केली आहे की, अमेरिकी नौदल आता होर्मुजच्या सामुद्रधुनीतून जाणार्या जहाजांची नाकाबंदी करेल. मार्गातून जाण्याचा प्रयत्न करणार्या कोणत्याही जहाजाला अडवले जाईल आणि त्याची तपासणी केली जाईल, विशेषतः ज्या जहाजांनी इराणला बेकायदेशीर टोल भरला आहे, त्या जहाजांना होर्मुजमधून सुरक्षित जाऊ दिले जाणार नाही. ही नाकाबंदी लवकरच सुरू होईल. ही जागतिक खंडणी असून, आम्ही इराणला बेकायदेशीर पद्धतीने कमाई करू देणार नाही. आम्ही होर्मुजमध्ये इराणने पेरलेले सुरूंगही नष्ट करू.










