Home / महाराष्ट्र / Maharashtra Heat Alert: उन्हाचा चटका वाढला! महाराष्ट्रात ‘हीट अलर्ट’ जारी; ४२ अंशांवर पारा, दुपारी घराबाहेर पडणे टाळा

Maharashtra Heat Alert: उन्हाचा चटका वाढला! महाराष्ट्रात ‘हीट अलर्ट’ जारी; ४२ अंशांवर पारा, दुपारी घराबाहेर पडणे टाळा

Maharashtra Heat Alert: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसानंतर आता उन्हाचा कडाका भयंकर वाढला आहे. भारतीय हवामान विभागाने संपूर्ण...

By: Team Navakal
Maharashtra Heat Alert
Social + WhatsApp CTA

Maharashtra Heat Alert: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसानंतर आता उन्हाचा कडाका भयंकर वाढला आहे. भारतीय हवामान विभागाने संपूर्ण राज्यासाठी ‘हीट अलर्ट’ जारी केला असून, नागरिकांना भरदुपारी घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. पुढील ३ दिवसांत राज्याच्या तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

विदर्भ-मराठवाड्यात आग ओकणारा सूर्य

विदर्भातील अकोला आणि अमरावतीमध्ये पारा आताच ४२ अंशांपर्यंत पोहोचला आहे. नागपूरसह इतर शहरांमध्येही कोरडे हवामान असून उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. मराठवाड्यातही परिस्थिती वेगळी नाही; येथे पुढील ४८ तासांत तापमान ४० अंशांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. पावसानंतर अचानक वाढलेल्या या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत.

कोकणात आर्द्रतेमुळे उकाडा वाढला

मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी यांसारख्या किनारपट्टीच्या भागात कमाल तापमान ३४ ते ३६ अंशांच्या दरम्यान असले तरी, हवेतील आर्द्रतेमुळे (ह्युमिडिटी) उकाडा अधिक जाणवत आहे. दमट हवामानामुळे अंगाची लाहीलाही होत असून रात्रीच्या वेळीही उकाड्यापासून दिलासा मिळताना दिसत नाहीये.

मध्य आणि उत्तर महाराष्ट्राची स्थिती

  • मध्य महाराष्ट्र: पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये तापमान ४० अंशांच्या दिशेने सरकत आहे. आकाश निरभ्र असल्याने उन्हाची तीव्रता थेट जाणवत आहे.
  • उत्तर महाराष्ट्र: नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबारमध्ये तापमान ३४ ते ३९ अंशांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. येथेही पावसाची कोणतीही शक्यता नसून कोरडे हवामान कायम राहील.

हवामान विभागाचा सल्ला

१५ एप्रिलपर्यंत तापमानातील ही वाढ कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. उष्माघाताचा त्रास टाळण्यासाठी दुपारच्या वेळी बाहेर फिरणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि सुती कपड्यांचा वापर करावा, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

Web Title:
संबंधित बातम्या