Hormuz: इराण – अमेरिका युद्ध आता अत्यंत धोकादायक वळणावर येऊन ठेपले आहे. पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये झालेली बैठक निष्फळ ठरल्यानंतर संतापलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी रविवारी इराणची सागरी नाकेबंदी करण्याचा इशारा दिला होता. ट्रम्प यांनी इराणला आज सोमवारपर्यंतची मुदत दिली होती. या मुदतीत इराण नमते घेईल, अशी ट्रम्प यांना अपेक्षा होती. मात्र, इराण आपल्या भूमिकेपासून तसूभरही हलण्यास तयार नसल्याचे दिसताच ट्रम्प यांनी होर्मुजची नाकेबंदी सुरू केली. त्याचवेळी इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात उद्या चर्चा होणार आहे. ही चर्चा यशस्वी झाली तर इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा चर्चा होऊन मार्ग निघण्याची
शक्यता आहे.
इस्रायल आणि अमेरिकेने युद्ध छेडल्यानंतर इराणने होर्मुजची सामुद्रधुनी रोखून ट्रम्प यांना जशास तसे उत्तर दिले. होर्मुज रोखल्यामुळे जगाची तेल चिंता वाढली. कच्च्या तेलाचे भाव प्रति पिंप 110 डॉलरच्या आसपास पोहोचले. स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा निर्माण झाला. त्यानंतर ट्रम्प यांनी दोन आठवड्यांचा युद्धविराम घोषित केला. याला इराणनेही काही अटींवर सहमती दर्शवली. होर्मुज तात्पुरत्या स्वरुपात खुली केली. या युद्धविरामामुळे जगाला फार मोठा दिलासा लाभला. मात्र तो फारच अल्पजीवी ठरला. युद्धविरामावर सहमती झाल्याने निर्माण झालेल्या आशादायक वातावरणात पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या मध्यस्थीने इराण-अमेरिकादरम्यान शांततेसाठी बैठक आयोजित करण्यात आली. मात्र तब्बल 21 तास काथ्याकूट करूनही या बैठकीतून काहीही निष्पन्न झाले नाही. इराण आणि अमेरिकेने बैठक अपयशी ठरण्याचे खापर एकमेकांच्या डोक्यावर फोडले.
बैठक असफल ठरल्याने ट्रम्प कमालीचे संतापले. काल-परवापर्यंत होर्मुज खुली करा, अशी इराणकडे सातत्याने मागणी करणार्या ट्रम्प यांनी आता स्वतःच होर्मुज बंद करण्याचा इशारा दिला.
होर्मुज सामुद्रधुनी ही इराणची जीवनवाहिनी मानली जाते. या जलमार्गातून इराण विविध देशांना तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा करून कोट्यवधी रुपये कमावतो. हाच पैसा देशाचा गाडा चालवण्यासाठी आणि लष्करी सामर्थ्य वाढवण्यासाठी वापरला जातो. नेमकी हीच बाब ओळखून ट्रम्प यांनी होर्मुजच्या सामुद्रधुनीसह इराणच्या चार प्रमुख बंदरांची नाकेबंदी करण्याचा डाव टाकला आहे. खर्ग द्वीप, जास्क टर्मिनल, बंदर अब्बास आणि बंदर खोमैनी या चार प्रमुख बंदरांची पूर्णपणे नाकाबंदी करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. तसे झाल्यास इराणची आर्थिक कोंडी तर होईलच, पण त्याचबरोबर कच्चे तले आणि नैसर्गिक वायूचा भडका उडेल. किमती गगनाला भिडतील. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष आता इराणकडे लागले आहे.
लेबनॉन-इस्रायलची आज शांतता बैठक
इराण – अमेरिका चर्चा निष्फळ ठरल्यानंतर उद्या अमेरिकेत होणार्या लेबनॉन – इस्रायल यांच्यातील शांतता चर्चेवरही प्रश्नचिन्ह लागले आहे. कारण युद्धविरामाच्या करारात लेबनॉनचा समावेश नको, अशी इस्रायलची भूमिका आहे. तर करारात लेबनॉनचा समावेश करण्यावर इराण ठाम आहे. दुसरीकडे इस्लामाबाद बैठक निष्फळ ठरल्यानंतर इस्रायलने रविवारी लेबनॉनची राजधानी बैरूतसह दक्षिण लेबनॉनमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले केले. एकंदरीत अशा परिस्थितीत लेबनॉन-इस्रायल बैठकीवर अनिश्चिततेचे सावट आहे.










