Ashok Kharat : नाशिकमधील बहुचर्चित भोंदूबाबा अशोक खरात याच्या अघोरी कृत्यांचा आणि महिलांच्या शोषणाचा पर्दाफाश झाल्यानंतर, आता न्यायालयीन प्रक्रियेतही अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. आज नाशिक सत्र न्यायालयात चौथ्या गुन्ह्यासंदर्भात खरातला ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ (VC) द्वारे हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंचा प्रदीर्घ युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने अशोक खरातला १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या सुनावणीदरम्यान न्यायालयात उद्भवलेला तांत्रिक पेच आणि खरातच्या सासूने दिलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
न्यायालयात तांत्रिक अडथळा आणि मोबाईलवरून सुनावणी-
आजच्या सुनावणीवेळी एक विचित्र तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुरू असताना न्यायालयातील आवाज आरोपी अशोक खरातपर्यंत पोहोचत नसल्याने सुनावणी १० ते १२ मिनिटांसाठी स्थगित करावी लागली. अखेरीस, न्यायालयात उपस्थित असलेल्या एका महिला पोलीस अधिकाऱ्याने आपल्या वैयक्तिक मोबाईलवरून खरातसोबत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला ‘व्हिडिओ कॉल’ केला. या अभिनव प्रयोगाद्वारे आरोपीचा न्यायाधीशांशी संपर्क प्रस्थापित करण्यात आला आणि सुनावणी पूर्ण झाली. न्यायाधीशांनी पोलिसांच्या वर्तणुकीबद्दल विचारणा केली असता, खरातने कोणतीही तक्रार नसल्याचे सांगितले.
सरकारी वकिलांचा युक्तिवाद आणि गंभीर आरोप-
सरकारी वकिलांनी खरातच्या पोलीस कोठडीची मागणी करताना त्याच्या गुन्ह्याची भीषणता न्यायालयासमोर मांडली. खरात महिलांना ‘ताब्याच्या भांड्यातील पाणी’ किंवा ‘पेढा’ प्रसाद म्हणून देत असे, ज्यात गुंगीचे औषध मिसळलेले असायचे, असा युक्तिवाद वकिलांनी केला. “मी देवाचा अवतार आहे आणि माझ्याशी संबंध ठेवल्याने तू पवित्र झाली आहेस,” असे सांगून तो पीडित महिलांचे शोषण करत असे. तो महिलांना प्रसादातून नेमके कोणते अमली पदार्थ किंवा द्रव देत होता, याचा शोध घेणे अद्याप बाकी आहे. आरोपीची कार्यपद्धती (Modus Operandi) सारखी असली, तरी पीडित महिलांची संख्या मोठी असून त्यात विधवा आणि विवाहित महिलांचा समावेश आहे, असे वकिलांनी अधोरेखित केले.
बचाव पक्षाचा युक्तिवाद आणि न्यायालयाचा निर्णय:
अशोक खरातच्या वकिलांनी कोठडीला विरोध करताना सांगितले की, मागील तीन गुन्ह्यांमध्येही सरकारी पक्षाने हाच युक्तिवाद केला होता आणि द्रव्यांचा तपास आता ‘एसआयटी’ (SIT) कडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा पाच दिवसांच्या कोठडीची आवश्यकता नाही. मात्र, गुन्ह्याचे गांभीर्य आणि तपासाची व्याप्ती लक्षात घेता, न्यायालयाने खरातच्या कोठडीत १८ एप्रिलपर्यंत वाढ करण्याचा निर्णय दिला.
सासू पार्वती शिंदे यांचा जबाब-
या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा दुवा म्हणजे अशोक खरातची सासू पार्वती शिंदे यांचा जबाब. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, त्यांना जावयाच्या या कारनाम्यांची कोणतीही कल्पना नव्हती. “तो त्याच्या कार्यालयात काय करायचा, हे मला किंवा माझ्या मुलीला (कल्पना खरात) ठाऊक नव्हते,” असा दावा त्यांनी केला. आपली मुलगी कल्पना सध्या कुठे आहे, याबद्दलही त्यांनी अनभिज्ञता दर्शवली.









