Home / क्रीडा / SRH vs RR : नागपूरच्या पोराचा आयपीएलमध्ये डंका! प्रफुल हिंगेचं भाकीत खरं ठरलं; पहिल्याच बॉलवर विकेट घेतल्यानंतर व्यक्त केल्या भावना…

SRH vs RR : नागपूरच्या पोराचा आयपीएलमध्ये डंका! प्रफुल हिंगेचं भाकीत खरं ठरलं; पहिल्याच बॉलवर विकेट घेतल्यानंतर व्यक्त केल्या भावना…

SRH vs RR : आयपीएल २०२६ च्या हंगामातील २१ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सवर ५७ धावांनी दणदणीत विजय मिळवला....

By: Team Navakal
SRH vs RR :
Social + WhatsApp CTA

SRH vs RR : आयपीएल २०२६ च्या हंगामातील २१ व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सवर ५७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात विजय मिळवण्यापेक्षा हैदराबादच्या एका मराठमोळ्या गोलंदाजाने केलेल्या कामगिरीची चर्चा अधिक रंगली आहे. विदर्भाच्या प्रफुल हिंगे याने आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच राजस्थानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. हैदराबादने दिलेल्या २१७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ १९ व्या षटकात १५९ धावांवरच गारद झाला. प्रफुल हिंगे आणि साकिब हुसेन या जोडीने प्रत्येकी ४ बळी घेत राजस्थानला गुडघे टेकण्यास भाग पाडले.

पदार्पणातील विक्रमी कामगिरी आणि प्रफुलचा संकल्प-
सामना संपल्यानंतर प्रफुल हिंगेला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल ‘सामनावीर’ म्हणून गौरवण्यात आले. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना प्रफुल म्हणाला की, “अशा प्रकारच्या पदार्पणाचे स्वप्न मी गेल्या वर्षीच पाहिले होते. मी माझ्या डायरीत लिहून ठेवले होते की, जेव्हा मी पहिला सामना खेळेल तेव्हा पॉवरप्लेच्या षटकांत वर्चस्व गाजवून ४ ते ५ बळी घेईन. संकल्पातील सामर्थ्यावर माझा गाढा विश्वास आहे.” प्रफुलने आपल्या संघर्षाची आठवण करून देताना सांगितले की, वयाच्या १३ व्या वर्षी त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली, तेव्हा त्याला लेदर बॉल क्रिकेटची ओळखही नव्हती. वडिलांनी सुरुवातीला दोनदा नकार दिला होता, मात्र जिद्दीच्या जोरावर त्याचा हा प्रवास सुरू झाला आणि आज तो या मोठ्या मंचावर उभा आहे. त्याने आपला हा पुरस्कार कुटुंबीयांना समर्पित केला.

वैभव सूर्यवंशीची विकेट आणि रणनीती-
प्रफुलने आपल्या स्पेलमध्ये सर्वात महत्त्वाची विकेट ‘बेबी सेन्सेशन’ वैभव सूर्यवंशीची असल्याचे सांगितले. वैभव सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याने त्याला बाद करणे हे प्रफुलचे मुख्य लक्ष्य होते. प्रफुल म्हणाला, “मी सहकाऱ्यांना आधीच सांगितले होते की, वैभवला पहिल्याच चेंडूवर बाद करायचे आहे, मग तो चेंडू बाऊन्सर असो किंवा इतर कोणताही. त्याची विकेट मिळवणे ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे.” या यशात गोलंदाजी प्रशिक्षक वरुण भाई यांचे मार्गदर्शन आणि पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे त्याने आभार मानले.

राजस्थानच्या नावे नकोसा विक्रम-
या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या नावे एक नकोसा विक्रम नोंदवला गेला. हैदराबादच्या भेदक गोलंदाजीसमोर राजस्थानचे आघाडीचे चार फलंदाज अवघ्या २ धावांवरच तंबूत परतले होते. आयपीएलच्या इतिहासात आघाडीच्या चार फलंदाजांनी नोंदवलेली ही सर्वात नीचांकी धावसंख्या ठरली आहे. यापूर्वी २०२० मध्ये चेन्नई सुपर किंग्सची मुंबई इंडियन्स विरुद्ध ३ धावांवर ४ बळी अशी अवस्था झाली होती.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या