TCS Nashik Case : ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ (TCS) सारख्या प्रतिष्ठित बहुराष्ट्रीय कंपनीच्या नाशिकमधील बीपीओ केंद्रात घडलेल्या कथित लैंगिक अत्याचार आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरून गेले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी, एचआर प्रमुख (HR Head) अश्विनी चेनानी हिला दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने चेनानी यांची रवानगी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत केली आहे.
एचआर मॅनेजरच्या भूमिकेवर गंभीर संशय-
या संपूर्ण प्रकरणात पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीकडे अश्विनी चेनानी यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. कंपनीत एचआर मॅनेजर म्हणून कार्यरत असताना, कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करणे ही त्यांची जबाबदारी होती. मात्र, पीडितेवर होणाऱ्या अन्यायाची माहिती असूनही त्यांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही, उलट आरोपींना पाठीशी घातल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तपासादरम्यान चेनानी यांची भूमिका संशयास्पद आढळल्याने त्यांना अटक करण्यात आली होती.
फॉरेन्सिक पुरावे आणि तपासाची व्याप्ती-
विशेष तपास पथकाने (SIT) या प्रकरणाचा तपास अधिक वेगवान केला आहे. आरोपींनी पीडितेवर विविध रिसॉर्ट्स आणि इतर गुप्त ठिकाणी नेऊन अत्याचार केल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी या गुन्ह्याशी संबंधित ठिकाणांहून महत्त्वपूर्ण फॉरेन्सिक (न्यायवैद्यक) पुरावे गोळा केले आहेत. या पुराव्यांमुळे आरोपींविरुद्धचा खटला अधिक भक्कम होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत या प्रकरणात एचआर मॅनेजर आणि टीम लीडर्ससह एकूण सात जणांना बेड्या ठोकण्यात आल्या असून, कंपनीच्या अंतर्गत वर्तुळातील अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
फरार संशयित निदा खानचा शोध जारी-
या गुन्ह्यातील एक महत्त्वाची महिला संशयित निदा खान अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही. ती इतर आरोपींची सक्रिय सहकारी असून, कंपनीतील तरुण मुलींचे ब्रेनवॉश करून त्यांना विशिष्ट धार्मिक पद्धतींचे प्रशिक्षण देत असल्याचा खळबळजनक आरोप तिच्यावर आहे. निदा खानच्या अटकेनंतर या प्रकरणातील ‘धर्मांतर’ कोणाचे आणि कशासाठी होते, याचा मोठा उलगडा होण्याची शक्यता आहे. पोलीस आणि विशेष तपास पथकाची विविध पथके सध्या तिचा कसून शोध घेत आहेत.











