IPL 2026 : ‘इंडियन प्रीमियर लीग २०२६’ च्या हंगामात तीन वेळचा विजेता संघ असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सची (KKR) अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरलेल्या या संघाला सलग दुसऱ्या हंगामात सूर गवसलेला नाही. शुक्रवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या चुरशीच्या लढतीत गुजरात टायटन्सने कोलकाताचा ५ गडी राखून पराभव केला. या पराभवामुळे कोलकाताच्या गोटात निराशेचे सावट असून, संघाच्या कामगिरीवर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सने निर्धारित २० षटकांत सर्वबाद १८० धावा धावफलकावर लावल्या. कॅमरून ग्रीन याने ७९ धावांची झुंजार खेळी करत संघाचा डाव सावरण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र इतर फलंदाजांची त्याला पुरेशी साथ लाभली नाही. १८१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल याने आक्रमक पवित्रा घेतला. गिलच्या शानदार ८६ धावांच्या खेळीच्या जोरावर गुजरातने १९.४ षटकांत विजय संपादन केला आणि कोलकाताच्या पदरी पुन्हा एकदा अपयश आले.
१९ वर्षांतील सर्वात मानहानीकारक कामगिरी-
कोलकाता नाईट रायडर्सच्या ‘कोरबो लोरबो जीतबो’ या ब्रीदवाक्याला यंदाच्या हंगामात सुरुंग लागला आहे. आयपीएलच्या १९ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कोलकाताला सुरुवातीच्या सहा सामन्यांपैकी एकही सामना जिंकता आलेला नाही. खेळलेल्या ६ सामन्यांपैकी ५ सामन्यांत त्यांना पराभवाचा धक्का बसला, तर एक सामना पावसामुळे रद्द झाल्याने त्यांच्या खात्यात केवळ १ गुण जमा आहे. ही आकडेवारी केकेआरच्या चाहत्यांसाठी अत्यंत धक्कादायक आणि अपमानजनक मानली जात आहे.
कोलकातासाठी आता ‘करो या मरो’ची स्थिती-
गुणतालिकेत सध्या तळच्या स्थानी असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सचा ‘नेट रनरेट’ उणे १.१४९ असा चिंताजनक आहे. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी साधारणतः १६ गुणांची आवश्यकता असते. केकेआरचे आता केवळ ८ सामने शिल्लक असून, स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांना हे सर्वच्या सर्व ८ सामने जिंकणे अनिवार्य आहे. एक जरी पराभव झाला, तरी त्यांचे आव्हान संपुष्टात येण्याची शक्यता ९० टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे आता केवळ एखादा तांत्रिक चमत्कारच त्यांना अंतिम चारमध्ये स्थान मिळवून देऊ शकतो.
मुंबई इंडियन्ससमोरही आव्हानांचा डोंगर-
दुसरीकडे, पाच वेळचा विजेता मुंबई इंडियन्सचा संघही यंदा चाचपडताना दिसत आहे. पाच सामन्यांनंतर मुंबईच्या खात्यात केवळ २ गुण असून ते गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहेत. सलग चार पराभवांमुळे त्यांचा मार्गही खडतर झाला आहे. मुंबईला जर १६ गुणांचा जादुई आकडा गाठायचा असेल, तर त्यांना उर्वरित ९ सामन्यांपैकी किमान ७ सामने जिंकावे लागतील. एखादा सामना पावसामुळे रद्द झाला किंवा पराभव झाला, तर मुंबईच्या अडचणीत भर पडणार आहे. सुरक्षित राहण्यासाठी मुंबईला ९ पैकी ८ सामने जिंकण्याचे लक्ष्य ठेवावे लागेल, जे सध्याच्या कामगिरीनुसार मोठे आव्हान मानले जात आहे.










