CPI MP on PM Modi – महिला आरक्षण विधेयक संसदेत नामंजूर झाल्यानंतर देशाला उद्देशून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणावर भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे (सीपीआय) नेते , राज्यसभेतील खासदार संतोष कुमार यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले असून पाच राज्यांमध्ये विधासभा निवडणुकांची आचारसंहिता लागू असताना मोदींनी भाषण करून आचारसंहितेचा भंग केला आहे, असा मुद्दा संतोष कुमार यांनी उपस्थित केला आहे.
या प्रकरणी तत्काळ दखल घेऊन आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.पाच राज्यांमध्ये निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना पंतप्रधान मोदी यांनी केलेले भाषण हे राजकीय हेतूने प्रेरित होते. समाजामध्ये फूट पाडून मतदारांवर प्रभाव टाकण्याचा उद्देश मोदींच्या भाषणातून स्पष्ट दिसतो. हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे.त्याचबरोबर मोदींचे या भाषणाचे दूरदर्शन आणि संसद टीव्ही यांसारख्या सरकारी वाहिन्यांवर प्रसारण करणे हा जनतेच्या पैशांचा दुरुपयोग आहे, असा आक्षेप संतोष कुमार यांनी घेतला आहे.
काल मोदींच्या भाषणानंतर काही वेळातच पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राज्यसभेचे खासदार आणि ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ कपिल सिब्बल यांनी अशीच भूमिका मांडली होती. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या पदाची प्रतिष्ठा कमी केली असून निवडणूक काळात पंतप्रधानांनी अशा प्रकारे राजकीय भाषण करणे हे राजकारणातील नव्या अधोगतीचे लक्षण आहे, अशी जळजळीत टीका सिब्बल यांनी केली.











