Home / क्रीडा / GT Vs MI IPL 2026 : मुंबईचा स्वाभिमान जागा झाला! विजयासाठी आसुसलेल्या मुंबईला तिलक वर्माची तारणहार साथ.

GT Vs MI IPL 2026 : मुंबईचा स्वाभिमान जागा झाला! विजयासाठी आसुसलेल्या मुंबईला तिलक वर्माची तारणहार साथ.

GT Vs MI IPL 2026 : सलग चार पराभवांच्या नामुष्कीनंतर मुंबई इंडियन्सने अखेर आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत आयपीएल २०२६...

By: Team Navakal
GT Vs MI IPL 2026 
Social + WhatsApp CTA

GT Vs MI IPL 2026 : सलग चार पराभवांच्या नामुष्कीनंतर मुंबई इंडियन्सने अखेर आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत आयपीएल २०२६ च्या हंगामात जोरदार पुनरागमन केले आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या ३० व्या सामन्यात, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबईने गुजरात टायटन्सवर ९९ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयामुळे मुंबईने स्पर्धेतील आपले आव्हान केवळ जिवंत ठेवले नाही, तर गुणतालिकेतही मोठी झेप घेतली आहे.

मुंबईची फलंदाजी: सुरुवातीचा अडखळ आणि टिळक वर्माचा ‘तांडव’-
गुजरातचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली; सलामीवीर दानिश (१० धावा) आणि क्विंटन डी कॉक स्वस्त्यात बाद झाले. सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमार यादवलाही या सामन्यात केवळ १५ धावांवर समाधान मानावे लागले. अवघ्या ४४ धावांत ३ बळी गेल्यानंतर, तरुण फलंदाज तिलक वर्माने डावाची सूत्रे हाती घेतली. सुरुवातीला संयमी खेळ करणाऱ्या तिलकने २२ चेंडूंमध्ये १९ धावा केल्या होत्या, परंतु त्यानंतर त्याने आक्रमक पवित्रा घेत अवघ्या २३ चेंडूंमध्ये ८२ धावांची लयलूट केली. त्याच्या या वादळी खेळीमुळे मुंबईने शेवटच्या ६ षटकांत तब्बल ९८ धावा कुटल्या आणि निर्धारित २० षटकांत १९९ धावांचा डोंगर उभा केला. दुसरीकडे, कर्णधार हार्दिक पांड्याचा खराब फॉर्म कायम असून त्याने १६ चेंडूंत केवळ १५ धावा केल्या.

गुजरातचा फलंदाजीचा कोसळलेला डोलारा-
२०० धावांच्या विस्तीर्ण लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सची अवस्था ‘ये रे माझ्या मागल्या’ अशी झाली. अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने डावाच्या पहिल्याच चेंडूवर साई सुदर्शनला बाद करून गुजरातला मोठा धक्का दिला. त्यानंतर ठराविक अंतराने जोस बटलर (५), शुभमन गिल (१४) आणि ग्लेन फिलिप्स (६) बाद झाल्यामुळे गुजरातचा अर्धा संघ केवळ ५५ धावांवर तंबूत परतला.

अश्विनी कुमारची भेदक गोलंदाजी-
जसप्रीत बुमराहने दिलेल्या धक्क्यांनंतर युवा गोलंदाज अश्विनी कुमारने गुजरातच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्याने एकापाठोपाठ एक राहुल तेवतिया, रशीद खान आणि शाहरुख खान यांना बाद करत एकूण ४ बळी टिपले. गुजरातचा संपूर्ण संघ १८ व्या षटकात अवघ्या १०० धावांवर गारद झाला. बुमराह आणि अश्विनी कुमारच्या धारदार माऱ्यासमोर गुजरातचा एकही फलंदाज तग धरू शकला नाही.

गुणतालिकेतील मोठी उलथापालथ-
या दणदणीत विजयामुळे मुंबई इंडियन्सला गुणतालिकेत संजीवनी मिळाली आहे. सलग पराभवांमुळे १० व्या स्थानावर फेकली गेलेली मुंबई आता थेट सातव्या क्रमांकावर पोहोचली आहे. ६ सामन्यांत २ विजय आणि ४ पराभवांसह मुंबईचे सध्या ४ गुण झाले असून, त्यांच्या ‘नेट रन रेट’मध्येही मोठी सुधारणा झाली आहे. दुसरीकडे, गुजरात टायटन्स ६ गुणांसह सहाव्या स्थानावर कायम असली, तरी या मोठ्या पराभवामुळे त्यांच्या मनोबलाला तडा गेला आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या