Home / महाराष्ट्र / Jay Pawar : पोटनिवडणुकीच्या आडून स्वतःचेच ‘ब्रँडिंग’?२०२९ च्या उमेदवारीचे संकेत देत जय पवारांनी पेरली राजकीय बीजे..

Jay Pawar : पोटनिवडणुकीच्या आडून स्वतःचेच ‘ब्रँडिंग’?२०२९ च्या उमेदवारीचे संकेत देत जय पवारांनी पेरली राजकीय बीजे..

Jay Pawar : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची धुरा त्यांचे...

By: Team Navakal
Jay Pawar
Social + WhatsApp CTA

Jay Pawar : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची धुरा त्यांचे पुत्र जय पवार यांनी समर्थपणे पेलल्याचे चित्र दिसत आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत जय पवार यांनी प्रत्यक्ष निवडणूक केंद्रांवर जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि मतदानाचा आढावा घेतला. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या विक्रमी विजयाचा विश्वास व्यक्त केलाच, शिवाय आगामी २०२९ च्या विधानसभा निवडणुकीबाबतही महत्त्वपूर्ण भाष्य केले. सुनेत्रा पवार यांनी गेल्या काही काळात केलेल्या जनसंपर्काचा आणि विकासकामांचा फायदा या निवडणुकीत निश्चितपणे होईल आणि त्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याने विजयी होतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“बारामतीकरांनी निवडणूक स्वतःच्या हाती घेतली आहे”; सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयाचा जय पवारांना विश्वास-
मतदारांशी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी यंदा बारामतीत मतदानाचे सर्व जुने विक्रम मोडीत निघतील आणि सुनेत्रा पवार ऐतिहासिक मताधिक्याने विजयी होतील, असा दावा केला आहे.

विक्रमी मतदानाचे आवाहन आणि अपेक्षा-
जय पवार यांनी यावेळी मतदारांना मोठ्या संख्येने घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, “बारामतीमधील सुज्ञ मतदारांनी ही निवडणूक आता केवळ एका उमेदवाराची न ठेवता ती स्वतःच्या मनावर घेतली आहे. लोकांचा उत्साह पाहता, यंदा मतदानाची टक्केवारी ८५ ते ९० टक्क्यांच्या घरात जाईल, अशी आम्हाला खात्री आहे.” मतदानाचे हे वाढलेले प्रमाण परिवर्तनाची आणि विकासाची नांदी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बारामतीकरांचे हे उत्स्फूर्त प्रेम विजयाचा मार्ग सुकर करेल, असेही ते पुढे म्हणाले.

‘४ जून’च्या निकालाकडे सर्वांचे लक्ष-
निकालाच्या दिवसाबाबत भाष्य करताना जय पवार यांनी नमूद केले की, “येत्या ४ जून रोजी जेव्हा मतमोजणी होईल आणि निकाल जाहीर होतील, तेव्हा बारामतीमधील राजकीय चित्र पूर्णपणे स्पष्ट होईल. मात्र, सध्याची परिस्थिती आणि जनभावना पाहता, सुनेत्रा वहिनी रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून येतील, यात मला तिळमात्र शंका नाही.” त्यांच्या या विधानामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून, विजयाचा आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे.

२०२९ च्या विधानसभेचे रणशिंग आताच फुंकले? जय पवारांचे उमेदवारीबाबतचे विधान राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय-
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत पवार कुटुंबातील तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधी जय पवार यांच्या एका विधानाने राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. आगामी २०२९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत जय पवार स्वतः मैदानात उतरणार असल्याची चिन्हे आता गडद होऊ लागली आहेत. त्यांच्या या विधानामुळे पवार कुटुंबातील आणखी एक सदस्य अधिकृतपणे सक्रिय राजकारणाच्या रिंगणात उतरणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.

पोटनिवडणुकीत ‘प्रमोशन’? 
राजकारणात टायमिंगला अनन्यसाधारण महत्त्व असते, मात्र बारामती पोटनिवडणुकीच्या नाजूक टप्प्यावर जय पवार यांनी केलेले विधान त्यांच्या राजकीय प्रगल्भतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे ठरत आहे. एकीकडे मातोश्री सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी संपूर्ण महायुतीने कंबर कसली असताना, जय पवार यांनी २०२९ च्या उमेदवारीचे सूतोवाच करून या गंभीर लढाईला स्वतःच्या राजकीय लाँचिंगचे व्यासपीठ बनवले की काय, असे बोलले जात आहे.

कार्यकर्त्यांची मागणी की राजकीय रणनीती?
भविष्यातील उमेदवारीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जय पवार यांनी अत्यंत सावध, तरीही सूचक भूमिका मांडली. ते म्हणाले, “२०२९ च्या निवडणुकीत मी उमेदवार म्हणून समोर यावे, अशी सर्वसामान्य जनता आणि आमच्या कार्यकर्त्यांची आग्रही मागणी आहे. लोकांच्या मनात काय आहे हे स्पष्ट असले, तरी मला पक्षाचा एक निष्ठावान आणि छोटा कार्यकर्ता म्हणून काम करायला अधिक आवडेल. जनतेची सेवा करणे आणि सर्वांना मदत करणे हीच माझी सध्याची प्राथमिकता आहे.” मात्र, “माझी इच्छा काय आहे, यापेक्षा लोकांची मी उमेदवार वाहायची मागणी आहे,” असे म्हणून त्यांनी अप्रत्यक्षपणे २०२९ च्या उमेदवारी बद्दल सांगितले आहे.

पोटनिवडणुकीत भविष्याचे ‘प्रमोशन’?
जय पवार यांचे हे वक्तव्य सध्या सुरू असलेल्या २०२६ च्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. सध्या बारामतीची निवडणूक ही केवळ सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी नसून ती पवार कुटुंबाच्या राजकीय अस्तित्वाची आणि प्रतिष्ठेची लढाई आहे. अशा वेळी २०२९ च्या उमेदवारीचा विषय काढणे, हे २०२६ च्या निवडणुकीतच स्वतःचे राजकीय ‘प्रमोशन’ करण्याचा प्रयत्न तर नाही ना असे देखील बोलले जात आहे. एकीकडे सुनेत्रा पवारांचा प्रचार सुरू असतानाच स्वतःच्या भविष्यातील नेतृत्वाची बीजे पेरण्याची ही रणनीती हि अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरत आहे.

पवार कुटुंबातील नव्या पर्वाची नांदी-
या विधानामुळे एक गोष्ट मात्र पूर्णपणे स्पष्ट झाली आहे की, पवार कुटुंबातील पुढील पिढी आता सत्तेच्या राजकारणासाठी सज्ज झाली आहे. राजकारणाचा प्रदीर्घ वारसा लाभलेल्या या कुटुंबात आता जय पवारांच्या रूपाने नवीन नेतृत्व उदयाला येत आहे. त्यांनी मांडलेली ‘कार्यकर्ता’ म्हणून काम करण्याची भूमिका ही जरी विनम्र वाटत असली, तरी त्यामागे २०२९ च्या मोठ्या राजकीय तयारीचे संकेत दडलेले आहेत.

कार्यकर्ता की सत्तेचा दावेदार? विधानातील अंतर्विरोध-
जय पवार माध्यमांसमोर बोलताना म्हणतात की, त्यांना केवळ “छोटा कार्यकर्ता” म्हणून काम करायचे आहे, परंतु त्याच श्वासात ते २०२९ च्या उमेदवारीचे संकेतही देतात. हा अंतर्विरोध त्यांच्या विधानातील बेगडीपणा स्पष्ट करतो. जर खरंच कार्यकर्ता म्हणून काम करण्याची इच्छा असती, तर सत्तेच्या गणितांची चर्चा करण्यासाठी २०२९ पर्यंत प्रतीक्षा करणे शक्य होते. पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत अशा प्रकारची विधाने करणे हे मतदारांच्या मूळ प्रश्नांपासून लक्ष भरकटवणारे आणि केवळ ‘घराणेशाही’च्या वारशाला पुढे रेटणारे वाटत आहे.

पोलिंग एजंट्सकडून मिळालेला फीडबॅक-
जय पवार यांनी अत्यंत नियोजित पद्धतीने निवडणुकीची सूत्रे हाती घेतल्याचे त्यांच्या विधानावरून स्पष्ट होत आहे. ते म्हणाले, “मी स्वतः मतदारसंघातील आमच्या सर्व पोलिंग एजंट्सशी (मतदान केंद्र प्रतिनिधी) संपर्क साधून प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला आहे. कार्यकर्त्यांकडून मिळालेली माहिती आणि जमिनीवरील उत्साह पाहता, आमचे काम अत्यंत प्रभावीपणे सुरू आहे, याची खात्री पटली आहे.” कार्यकर्त्यांच्या या सक्रिय सहभागामुळेच विजयाचे समीकरण सुकर झाल्याचे त्यांनी नमूद केले.

‘विक्रमी मतदानाची’ बारामतीकरांना साद-
मतदानाच्या टक्केवारीबद्दल बोलताना जय पवार यांनी मोठी आशा व्यक्त केली आहे. “ज्या पद्धतीने बारामतीकरांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (दादा) यांच्यावर वर्षानुवर्षे प्रेम केले, तसेच प्रेम यावेळी दादा आणि सुनेत्रा वहिनी यांच्यावरही कायम ठेवावे, असे माझे कळकळीचे आवाहन आहे. बारामतीकरांनी ही निवडणूक आता वैयक्तिक पातळीवर मनावर घेतली आहे. त्यामुळे यंदा मतदानाचा टक्का कमालीचा वाढून तो ८५ ते ९० टक्क्यांपर्यंत पोहोचेल, अशी आम्हाला खात्री वाटत आहे,” असे जय पवार यांनी ठामपणे सांगितले.

महायुतीचे जय पवार यांनी २०२९ मधील आपल्या उमेदवारीबाबत सूचक विधान केल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) आमदार रोहित पवार यांनी त्यावर अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. “भविष्यात पुन्हा एकदा बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना रंगू शकतो,” असे भाकीत त्यांनी वर्तवले आहे.

पक्षीय निर्णय आणि कार्यकर्त्यांची इच्छा-
जय पवार यांनी “कार्यकर्त्यांच्या मागणीमुळे २०२९ मध्ये निवडणूक लढवण्याचे” संकेत दिले होते. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, राजकारणात अनेकदा कार्यकर्ता आणि पक्षाची इच्छा शिरसावंद्य मानावी लागते. जय पवार यांचा पक्ष वेगळा असून, त्यांच्या पक्षाने २०२९ मध्ये सुनेत्रा पवार यांच्याऐवजी दुसऱ्या कुणाला संधी देण्याचे ठरवले, तर ती एक सर्वपक्षीय मोठी लढाई ठरू शकते. सध्या आम्ही केवळ भावनिक दृष्टिकोनातून आणि कौटुंबिक नात्यापोटी या पोटनिवडणुकीत सुनेत्रा काकींचा प्रचार केला असला, तरी आमचे राजकीय विचार आणि पक्ष पूर्णपणे भिन्न आहेत, हे त्यांनी स्पष्ट केले.

युगेंद्र पवार विरुद्ध जय पवार: नव्या संघर्षाचे संकेत-
रोहित पवार यांनी २०२९ च्या संभाव्य रणसंग्रामाचे चित्र स्पष्ट करताना सांगितले की, “जर महायुतीकडून जय पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले, तर आमच्या पक्षाकडून युगेंद्र पवार हे त्यांचे प्रबळ प्रतिस्पर्धी असू शकतात. लोकसभेला आणि आता विधानसभेला जसा पवार विरुद्ध पवार असा संघर्ष महाराष्ट्राने पाहिला, तशीच पुनरावृत्ती २०२९ मध्येही होण्याची दाट शक्यता आहे.” दोन्ही बाजूंचे पक्ष आणि विचारधारा वेगळ्या असल्याने ही लढत अटळ असल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवले.

पवारांचे वलय संपवण्याचे राजकीय षडयंत्र?
या संघर्षावर भाष्य करताना रोहित पवार यांनी एका गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की, “पवार कुटुंबातच एकमेकांविरुद्ध लढाई व्हावी, ही बारामतीतील जनतेची किंवा सर्वसामान्य लोकांची इच्छा नाही. मात्र, काही राजकारण्यांना पवारांचे राजकीय वलय संपवायचे आहे. ज्यांना पवार कुटुंब आणि त्यांचे वर्चस्व खुपते, असे लोक जाणीवपूर्वक ही ‘पवार विरुद्ध पवार’ लढत लावून देण्यासाठी पडद्यामागून हालचाली करत आहेत.”

हे देखील वाचा – PM Modi vs Kharge: “मोदी हे दहशतवादी आहेत!” मल्लिकार्जुन खरगे यांच्या विधानाने खळबळ; निवडणूक आयोगाची नोटीस

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या