Ashok Kharat : स्वतःला “दैवी शक्तीचा अवतार” भासवून महिलांचे शोषण करणाऱ्या अशोक खरात याच्या पापाचा घडा आता पूर्णपणे भरला आहे. नाशिक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (SIT) केलेल्या चौकशीत अत्यंत विदारक आणि खळबळजनक माहिती समोर आली आहे. पीडित महिलांचे लैंगिक शोषण केल्यानंतर त्यांचे गर्भपात करण्यासाठी खरातने चक्क शहरातील काही नामांकित डॉक्टरांची आणि वैद्यकीय यंत्रणेची मदत घेतल्याचा प्रबळ संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणामुळे नाशिकच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील ‘काळे’ हात समोर येणार?
अशोक खरातने घरगुती संकटे आणि वैयक्तिक व्याधी दूर करण्याचे आमिष दाखवून अनेक निष्पाप महिलांना आपल्या जाळ्यात ओढले होते. तपासादरम्यान एका पीडितेच्या गर्भपाताचे प्रकरण उजेडात आले, ज्याने तपासाची चक्रे वेगाने फिरली. धक्कादायक बाब म्हणजे, या काळ्या कृत्यात नाशिक महानगरपालिकेच्या एका जबाबदार डॉक्टरासह काही खासगी डॉक्टरांचाही हात असल्याचे समजते. हे डॉक्टर खरातच्या नियमित संपर्कात होते आणि त्यांनी वैद्यकीय नीतिमत्ता धाब्यावर बसवून या गुन्ह्यात त्याला सहकार्य केल्याचा संशय एसआयटीने व्यक्त केला आहे.
गर्भपाताच्या गोळ्यांचा नियमबाह्य पुरवठा-
तपासातील प्राथमिक निष्कर्षांनुसार, जेव्हा एखादी पीडित महिला खरातच्या अत्याचारामुळे गरोदर राहायची, तेव्हा खरात तिला गर्भपातासाठी औषधे किंवा गोळ्या द्यायचा. कायद्याने या गोळ्या केवळ अधिकृत डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि औषधविक्रेत्यांकडून मिळणे अपेक्षित असताना, खरातपर्यंत या गोळ्या कोणाच्या माध्यमातून पोहोचल्या, याचा शोध आता घेतला जात आहे. काही सोनोग्राफी सेंटर चालकांनी आणि डॉक्टरांनी नियमबाह्य पद्धतीने या गोळ्यांचा पुरवठा केल्याचा संशय असून, पुरावे नष्ट करण्यासाठी विशिष्ट केंद्रांवर पीडितांची तपासणी केली जात होती का, याचाही सखोल तपास सुरू आहे.
पत्नी कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन फेटाळला-
अशोक खरातच्या गुन्ह्यांचे जाळे केवळ लैंगिक शोषणापुरते मर्यादित नसून, त्यात आर्थिक फसवणुकीचेही मोठे पदर आहेत. खरातची पत्नी कल्पना खरात हिच्यावर शिर्डी पोलीस ठाण्यात एका शेतकऱ्याची जमीन हडपल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेच्या भीतीने तिने राहाता येथील न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. मात्र, बुधवारी सुमारे सव्वा तास चाललेल्या प्रदीर्घ युक्तिवादानंतर न्यायालयाने तिचे गुन्हेगारी स्वरूपाचे वर्तन आणि फरार असण्याची बाब लक्षात घेऊन तिचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.










