Mumbai Crime : क्रीडा क्षेत्रातील एका नावाजलेल्या खेळाडूने गुन्हेगारी मार्ग पत्करल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जम्मू-काश्मीरची राष्ट्रीय स्तरावरील महिला क्रिकेटपटू फारखांदा खान हिने मुंबईतील एका तरुण उद्योगपतीला आपल्या जाळ्यात ओढून तब्बल ६३ लाख रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने याप्रकरणी फारखांदा खानसह तिचा भाऊ आणि एका साथीदाराला अटक केली असून, या कारवाईमुळे मुंबईसह जम्मू-काश्मीरमध्येही मोठी खळबळ उडाली आहे.
मैदानावरून गुन्हेगारीच्या ‘पिच’वर-
फारखांदा खान ही केवळ एक सामान्य खेळाडू नसून ती जम्मू-काश्मीरची राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आहे आणि तिने महिला टी-२० लीगमध्येही आपल्या खेळाचे प्रदर्शन केले आहे. मात्र, खेळाच्या मैदानात चमकण्याऐवजी तिने गुन्हेगारीचा मार्ग निवडला. या प्रकरणात पोलिसांनी फारखांदा खान, तिचा भाऊ बाझिल अझीझ खान आणि त्यांचा साथीदार इम्तियाज वाणी या त्रिकुटाला बेड्या ठोकल्या आहेत. फारखांदा आणि बाझिलला दिल्लीतील एका हॉटेलमधून, तर इम्तियाजला श्रीनगरमधून अटक करण्यात आली आहे.
मैत्रीचे रूपांतर धमकीत आणि खंडणीत
दक्षिण मुंबईतील कुलाबा भागात राहणारा २८ वर्षीय व्यावसायिक २०२४ मध्ये पश्चिम उपनगरात वास्तव्यास असताना फारखांदाच्या संपर्कात आला होता. ओळखीचे रूपांतर लवकरच मैत्रीत झाले. मात्र, जेव्हा फारखांदाने पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली आणि व्यावसायिकाने त्यास नकार दिला, तेव्हा तिचे खरे रूप समोर आले. दोघांमधील खासगी चॅट्स सार्वजनिक करण्याची आणि त्याला कायदेशीर अडचणीत आणण्याची धमकी देऊन तिने खंडणी उकळण्यास सुरुवात केली. एप्रिल २०२४ पासून या छळाचे सत्र सुरू होते.
लाखो रुपयांची लूट आणि कौटुंबिक सहभाग
पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, बदनामीच्या भीतीने व्यावसायिकाने सुरुवातीला २३ लाख आणि त्यानंतर ४० लाख असे एकूण ६३ लाख रुपये दिले. धक्कादायक बाब म्हणजे, उकळलेल्या या पैशांपैकी काही रक्कम साथीदार इम्तियाज वाणी याच्या बँक खात्यात, तर काही रक्कम फारखांदाचे वडील आणि भावाच्या खात्यात वळवण्यात आली. फारखांदाचा भाऊ बाझिल हा देखील या कटात सामील होता; तो संबंधित उद्योगपतीला “तुला तुरुंगात पाठवेन” अशी सातत्याने धमकी देत होता.
तपास सुरू; आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता
मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. या टोळीने अशाच प्रकारे इतर कोणाला जाळ्यात अडकवले आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी सुरू असून, या तपासातून या सेक्सटॉर्शन रॅकेटचे आणखी धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.










